राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष झाले सक्रिय

By admin | Published: June 15, 2017 12:35 AM2017-06-15T00:35:38+5:302017-06-15T00:35:38+5:30

निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी अधिसूचना जारी करून प्रक्रियेला सुरुवात केल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत.

All parties became active for presidential elections | राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष झाले सक्रिय

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष झाले सक्रिय

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी अधिसूचना जारी करून प्रक्रियेला सुरुवात केल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना सहमतीचा उमेदवार न ठरविता आल्यास १७ जुलैला मतदान होईल. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ जून रोजी उमेदवार जाहीर करणार आहे.
सत्ताधारी पक्षातर्फे राष्ट्रपतीपदासाठी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, राम नाईक, द्रौपदी मुरमू आदी नावांची चर्चा सुरू असली, ती आम्ही उमेदवार अद्याप ठरविलेला नाही, असे भाजपने स्पष्ट केले. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्वसंमतीने निवडला जावा, यासाठी विरोधकांशी चर्चा करण्याकरिता भाजपने राजनाथ सिंग, अरुण जेटली आणि वेंकय्या नायडू यांची आधीच समिती नियुक्त केली असून, त्या तिघांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. राजनाथ सिंग व जेटली शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना भेटणार आहेत.
त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बुधवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या कार्यालयात बैठक झाली. मात्र त्यात उमेदवार ठरला नाही.
‘या बैठकीत कोणत्याही नावावर चर्चा झाली नाही. पात्र व्यक्तीच्या निवडीसाठी आमच्या उपगटाची पुन्हा बैठक होईल’, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल (यू) चे नेते नितीशकुमार यांच्याशी जेटली चर्चा करणार असून, जम्मू-काश्मीर तसेच ईशान्येकडील पक्षांच्या नेत्यांशी चर्चेची जबाबदारी राजनाथ सिंग यांच्याकडे आहे. दक्षिणेकडील राज्यांतील पक्षांशी वेंकय्या नायडू वाटाघाटी करणार आहेत.

सहा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रपतीपद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरू झाली. पहिल्याच दिवशी मुंबईतील एका दाम्पत्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात तामिळनाडूचे के. पद्मराजन, मध्यप्रदेशचे आनंदसिंह कुशवाह, तेलंगणाचे ए. बाला राज, मुंबईतील दाम्पत्य सायरा बानो मोहंमद पटेल आणि मोहंमद पटेल अब्दुल हमीद, पुणे येथील विजयप्रकाश कोंडेकर यांचा समावेश आहे. यापैकी चार उमेदवारांनी १५ हजार रूपयांची सुरक्षा ठेव जमा केली नाही. एकाही उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून ५० आणि अनुमोदक म्हणून ५० अशा शंभर मतदारांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. त्यामुळे आज दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज फेटाळले जाणार आहेत.

... तरच मतदान
राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक उमेदवार २८ जूनपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. त्याचबरोबर २९ जून रोजी सकाळी ११ वाजेपासून १ जुलैच्या दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास आणि ते वैध ठरल्यास १७ जुलै रोजी मतदान होईल.

गांधी, यादव यांची नावे
हैदराबाद : डावे पक्ष राष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांचे नाव सुचविण्याच्या विचारात आहेत. तसेच जद (यू) नेते शरद यादव यांना उमेदवारी दिली, तर आमचा त्याला आक्षेप नसेल, असे एका डाव्या नेत्याने म्हटले.

Web Title: All parties became active for presidential elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.