उत्तर प्रदेशात सर्व पक्ष मैदानात; पण बसपाच्या मायावती घरातच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:44 AM2022-01-24T06:44:12+5:302022-01-24T06:44:57+5:30

पश्चिम उत्तर प्रदेशात ५८ जागांवर १० फेब्रुवारी रोजी मतदान

All parties on the ground in Uttar Pradesh; But in BSP's Mayawati house | उत्तर प्रदेशात सर्व पक्ष मैदानात; पण बसपाच्या मायावती घरातच

उत्तर प्रदेशात सर्व पक्ष मैदानात; पण बसपाच्या मायावती घरातच

googlenewsNext

लखनौ : पश्चिम उत्तर प्रदेशात ५८ जागांवर १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २२ जानेवारी रोजी तर भाजपाचे चार दिग्गज नेते पश्चिम उत्तर प्रदेशात प्रचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी आगामी २० दिवसांचा दौरा निश्चित केला आहे, तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी २२ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा करून विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती अद्यापही आपल्या घरातच आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यांनी आतापर्यंत एकही रॅली - सभा घेतलेली नाही. 

मायावती यांच्या या भूमिकेने बसपाचे समर्थकही बुचकळ्यात पडले आहेत, कारण भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे घराघरात जाऊन प्रचार करत आहेत. अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही सक्रिय आहेत; पण मायावती असे काही करताना दिसत नाहीत. घरीच पत्रकार परिषद घेऊन आणि ट्वीट करून त्या आपले मत व्यक्त करत आहेत. मायावती यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची परिस्थिती एवढी खराब आहे की, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराने काही तासांत आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला मतदान करून आपले मत वाया घालवू नये, तर बसपाला मतदान करावे. 

मायावतींची पकड समाप्त होऊ लागली : तिवारी 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी मायावती यांना उत्तर देताना म्हटले आहे की, पराभवाच्या भीतीने मायावती आता लक्ष विचलित करण्यासाठी असे ट्वीट करत आहेत. बसपावर आता मायावती यांची पकड समाप्त होत चालली आहे. बसपाचे अनेक आमदार अन्य पक्षांत गेले आहेत. दीर्घकाळापासून मायावती घराबाहेर न पडल्याने बसपाची ही परिस्थिती झाली आहे. 

बसपात साधनसंपत्तीचा अभाव : अजय बोस
मायावती यांच्यावर पुस्तक लिहिणारे अजय बोस यांचे म्हणणे आहे की, राज्याच्या राजकारणात मायावती कुठे दिसत नाहीत. गत पाच वर्षांत प्रेस नोट आणि ट्वीटच्या माध्यमातून त्या सक्रिय आहेत. मात्र, यामुळे बसपाच्या मतदारांचे पक्षाशी असलेले नाते कमी झाले आहे. मायावती घरातून बाहेर निघाल्या नाहीत तर पक्षाचे नुकसान होईल. त्यांच्याकडे निवडणूक प्रचारासाठी साधनसंपत्तीचा अभाव आहे. मायावती यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात त्यांचे भाचे आकाश आनंद, सतीश चंद्र मिश्र यांच्यासह १८ नावे आहेत. 

 

Web Title: All parties on the ground in Uttar Pradesh; But in BSP's Mayawati house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.