तेलंगणाच्या मैदानात सर्वच राजकीय पक्षांनी डावलले ‘स्त्री शक्ती’ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 05:55 AM2018-11-23T05:55:40+5:302018-11-23T05:59:12+5:30
महिला आरक्षणाच्या चर्चेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिलांवर अन्याय केला आहे. फारच कमी महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
- धनाजी कांबळे
हैदराबाद : महिला आरक्षणाच्या चर्चेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिलांवर अन्याय केला आहे. फारच कमी महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागा आहेत. मात्र, सर्वच पक्षांनी मोजक्या जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने तब्बल १०० महिलांना अर्ज दिले होते. प्रत्यक्षात ११ महिलांनाच उमेदवारी दिली. हे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने केवळ ४ महिलांना तिकीट दिले आहे. गेल्या वेळी पक्षाने सहा महिलांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या स्टार उमेदवार खुशबू सुंंदर यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हटले आहे. आमच्या पक्षाने सुरुवातीला हे विधेयक मांडले. मात्र, हे विधेयक मंजूर होण्याच्या दृष्टीने सध्याच्या एनडीए सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
या निवडणुकीत काँग्रेसने ११ महिलांना संधी दिली आहे.
टीआरएसने केवळ ४ महिलांनाच संधी दिली आहे, असेही खुशबू म्हणाल्या. माजी मंत्री जे. गीता रेड्डी, डी. के. अरुणा, सुनीता लक्ष्मा रेड्डी व सबिता इंद्रा रेड्डी या रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीतील तेलगू देसम १४ जागा लढवत असून, त्यापैकी एका जागी एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणूक लढवीत आहे.
तेलंगणा जन समिती आघाडीत सामील असून, त्या पक्षानेही सिद्धीपेठ मतदारसंघातून भावनी रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने १४ महिलांना संधी दिली आहे. एमआयएमने मात्र एकाही महिलेला तिकीट दिलेले नाही. आम्ही अधिक महिलांना उमेदवारी दिली असून, एससी, एसटी यांनाही प्रतिनिधीत्व दिल्याचे भाजपाच्या प्रवक्त्याने सांगितले. सीपीएम-बहुजन लेफ्ट फ्रन्टने दहा महिलांना उमेदवारी दिली असून, एका तृतीयपंथीलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
टीडीपीची मोफत सायकल
तेलगू देसमचा जाहीरनामा आला असून, त्यात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी व गुंतवणुकीस मदत करू, असे आश्वासन दिले आहे. आठवीपर्यंतच्या मुलींना सायकल आणि ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याची घोषणा केली आहे. टीडीपीचे प्रदेशाध्यक्ष एल. रामण्णा म्हणाले की, शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल आणि १0 हजार कोटी रुपये शेतीत खर्च केले जातील. शेतीमालाला किमान आधारभूत किमत दिली जाईल, एका वर्षात एक लाख बेरोजगारांना रोजगार दिला जाईल.
आधीच्या आश्वासनांचे काय झाले? - चिदम्बरम
तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असली तरीही
के. चंद्रशेखर राव यांचा धडाकेबाज प्रचार दिसत नसून, त्यांनी मौन धारण केले आहे. यामागे भाजपाने प्रतिनिधित्व दिल्याची परोपकारी भावना तर नाही ना, असा खोचक सवाल करीत याआधी सत्तेत येण्यासाठी केसीआर यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, ते आधी जनतेला सांगावे, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. हैदराबाद येथील गांधी भवनमध्ये त्यांनी केसीआर सरकारच्या कारभारावर टीका केली. मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, २२ लाख घरे, केजी टू पीजी मोफत शिक्षण अशी मोठमोठी आश्वासने के. चंद्रशेखर राव यांनी दिली होती. त्याचे पुढे काय झाले हे आधी सांगावे, असे चिम्दबरम म्हणाले.
चंद्राबाबू स्टेजवर नसतील!
निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी २३ नोव्हेंबरला राज्यात येणार आहेत. मात्र, काँग्रेस आघाडीत सहभागी झालेल्या तेलुगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे स्टेजवर सोनिया गांधी यांच्यासोबत नसतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत मात्र चंद्राबाबू प्रचारसभांमध्ये स्टेजवर असतील, असे तेलंगणा काँग्रेस कमिटीचे नेते आर. सी. खुंटिया यांनी सांगितले.
खा. रेड्डी यांची टीआरएसला सोडचिठ्ठी
टीआरएसचे नेते कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हा टीआरएसला हा मोठा धक्का आहे. रेड्डी हे मूळचे वैज्ञानिक असून, अपोलो हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक संगीता रेड्डी यांचे पती आहेत. रेड्डी यांनी पक्षाचा व लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. टीआरएसचे दोन खासदार आमच्या संपर्कात असून, ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे तेलंगणा काँग्रेसचे नेते रेवण रेड्डी म्हणाले.