दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:56 PM2024-05-29T16:56:36+5:302024-05-29T17:34:52+5:30
राजधानी दिल्लीत बुधवारी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
Delhi Temperature : देशाची राजधानी दिल्लीत लोक उष्णतेने होरपळून निघाले आहेत. बुधवारी पारा ५२ अंशांच्या पुढे गेला आहे. दिल्लीत पारा ५० अंशांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीत मंगळवारीही पारा ५० च्या जवळ पोहोचला होता. दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आणि अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र बुधवारी उष्णतेने कहर केला. दुपारी अडीच वाजता दिल्लीत ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
दिल्लीत बुधवारी उष्णतेचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत. पहिल्यांदाच दिल्लीत तापमान ५२ अंशांच्या पुढे गेलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीच्या मंगेशपूर भागात ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंगेशपुरमध्ये बुधवारी दुपारी २.३० वाजता५२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मंगेशपूरचे तापमान ५२.३ अंश सेल्सिअस असताना सरासरी तापमान ४५.८ अंश होते. यामुळे दिल्लीतील नागरिकांना आपण भट्टीत राहतोय की काय असा अनुभव आला.
दुसरीकडे, हवामान खात्याने बुधवारी सांगितले की, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती ३० मे पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्लीच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबत १ जून रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी असण्याची शक्यता आहे.