बसपा लढविणार मुंबईतील सर्व जागा
By admin | Published: September 24, 2014 02:44 AM2014-09-24T02:44:09+5:302014-09-24T02:44:09+5:30
आघाडी-युतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना बहुजन समाज पार्टीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे
मुंबई : आघाडी-युतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना बहुजन समाज पार्टीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील ३६ जागा पक्ष लढणार असून, उमेदवारांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व जागा लढवून विक्रम नोंदवला आहे. पक्षामार्फत राज्यातील निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत बसपाने स्वबळावर लढण्यिाचा निर्णय जाहीर केला असून, राज्यातील काही उमेदवारांची अधिकृत घोषणाही करण्यात आलेली आहे.
मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजे ३६ जागा बसपा लढणार आहे. मुंबईतील धारावी, चेंबूर, विक्रोळी, घाटकोपर आदी विभागांसह विविध भागांत बसपाला चांगला जनाधार आहे. बसपाचा उमेदवार प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची मते मोठ्या प्रमाणात घेण्याची शक्यता आहे. बसपाच्या कार्यकर्त्यांनाच यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले असून, त्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)