सर्व शिखांना खलिस्तान हवे -ग्यानी हरप्रीत सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:40 AM2020-06-08T05:40:06+5:302020-06-08T05:40:21+5:30
सरकारने दिले, तर आम्ही ते स्वीकारू
अमृतसर : सगळ्या शिखांना खलिस्तान हवे असून ते जर दिले गेले तर ते स्वीकारतील, असे अकाल तख्तचे कार्यकारी जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी शनिवारी येथे म्हटले. येथील सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ३६ वर्षांपूर्वी सहा जून रोजी लष्कराने कारवाई केली होती.
पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांंनी विचारले की, ‘‘याचा अर्थ तुम्ही खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देत आहात का?’’ त्यावर हरप्रीत सिंग म्हणाले, ‘‘जर सरकारने आम्हाला खलिस्तान दिले तर आम्ही आणखी काय मागणार? आम्ही ते स्वीकारू. प्रत्येक शिखाला खलिस्तान हवे आहे. शीख युवक खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असेल तर त्यात काही चूक नाही.’’ याच पत्रकार परिषदेत शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) अध्यक्ष गोबिंदसिंग लोंगोवाल अशाच प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, ‘‘जर कोणीही ते आम्हाला देऊ केले तर आम्ही ते स्वीकारू.’’ शिखांच्या पाच तख्तांमध्ये अकाल तख्त हे सर्वोच्च पीठ आहे. अकाल तख्त आणि एसजीपीसीने एकाच वेळी स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा द्यायची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
हरप्रीत सिंग आणि लोंगोवाल यांच्या वक्तव्यांना शीख फुटीरवादी आणि ‘दल खालसा’चा संस्थापक गजिंदर सिंग याने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘‘अकाल तख्तच्या नेत्याने आज त्यांच्या पद्धतीने खलिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या वक्तव्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला देवाचे आशीर्वाद लाभावेत.’’
पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी जे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवावी, असे म्हटले.