सहाही जणांना संसदेत जायचे होते, परंतु दोघांनाच पास मिळाले; पाचव्या व्यक्तीलाही पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:51 AM2023-12-14T10:51:53+5:302023-12-14T10:52:13+5:30
सहाव्या आरोपीचा शोध सुरू
नवी दिल्ली :संसदेच्या सभागृहात बुधवारी झालेला प्रकार हा नियोजित कट होता आणि सहा आरोपींनी तो कट केला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. सागर शर्मा आणि मनोरंजन हे लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत होते. तर, अमोल शिंदे आणि नीलम संसदेच्या बाहेर पकडले गेले. हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. ललित आणि विक्रम हे त्यांचे साथीदार असल्याचा संशय आहे. विक्रमला गुरुग्राममधून ताब्यात घेण्यात आले आहे, तर ललितला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
...तर त्याला फाशी द्या
माझ्या मुलाने चांगले काम केले असेल तर ठीक आहे, पण जर त्याने काही चूक केली असेल तर त्याला फाशी द्या. तो माझा मुलगा नाही, ती संसद आमची आहे. त्यावर जो कोणी हल्ला करतो तो निषेधार्ह आहे. आम्ही हे मान्य करणार नाही. माझा मुलगा चांगला मुलगा आहे. तो प्रामाणिक आणि सत्यवादी आहे. समाजाचे भले करणे आणि समाजासाठी त्याग करणे हीच त्याची इच्छा असते. तो स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचत असे. असे विचारही पुस्तके वाचून त्याच्या मनात निर्माण झाले असे मला वाटते.
- देवराज गौडा, मनोरंजन डी. याचे वडील
पास कसा मिळवला?; प्लॅन कसा आखला?
पाससाठी ते तीन महिन्यांपासून प्रयत्नात होते. आरोपींनी काही दिवसांपूर्वी ही योजना आखली होती. बुधवारी संसदेत येण्यापूर्वी त्यांनी एक रेकी केली होती, असे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी पाच जण संसदेत येण्यापूर्वी गुरुग्राममधील विक्रमच्या निवासस्थानी थांबले होते. योजनेनुसार, सहाही जणांना संसदेत जायचे होते; परंतु फक्त दोघांना पास मिळाले. हे सहा आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे अमोल शिंदे याच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यांची विचारसरणी सारखीच होती आणि म्हणूनच त्यांनी सरकारला संदेश देण्याचे ठरवले.
जिंको किंवा हारो, प्रयत्न करणे महत्त्वाचे...
“हारो वा जिंको, पण प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता बघायचे हा प्रवास किती सुंदर होतो. आशा आहे, पुन्हा भेटू.” असे लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगत संकेतच दिला होता. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याने दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निषेधात भाग घेण्यासाठी लखनौमधील घर सोडले; परंतु, तो असे करेल याची माहिती नव्हती. त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील आहे. तो नुकताच बंगळुरूहून लखनौला परतला होता. रिक्षा चालवत असे.