ईशान्य भारतामधील सर्व राज्ये रेल्वेने जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:18 AM2018-05-13T01:18:48+5:302018-05-13T01:18:48+5:30
ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.
नवी दिल्ली : ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशात ७९५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे.
अरुणाचल प्रदेशातील रेल्वेसेवेमुळे सीमेपाशी राहणाऱ्या भारतीयांचा प्रवास सोपा होईल, लष्कराला साधनसामग्रीची वाहतूक करणेही शक्य होईल. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील बोगीबील पूल लवकरच खुला होणार असून, त्यामुळे या दोन राज्यांतील रेल्वेसेवाही शक्य होईल. सध्या आसाम, त्रिपुरा व अरुणाच प्रदेशचा अगदी लहान भाग रेल्वेने जोडला गेला आहे. मात्र अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरसह मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम व नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेलेल्या नाहीत. भैराबी व सायरंग या ५१ किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐझवालला जोडली जाईल. सायरंग हे ऐझवालपासून १८ किमीवर आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सिक्किममध्ये सुरु आहे. ते पूर्ण होण्याआधी पाक्योंग येथे विमानतळ बांधण्यात आल्याने तेथील लोकांना विमान व रेल्वेसेवा मिळणार आहेत.