कापूस बाजाराची सर्व भिस्त कच्च्या तेलावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2015 11:32 PM2015-12-10T23:32:41+5:302015-12-10T23:32:41+5:30
जोपर्यंत कच्च्या तेलाचे भाव वाढणार नाहीत तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सिंथेटिक कापडाचा उठाव कमी होऊन सुताच्या कापडाची मागणी वाढणार नाही.
चंद्रकांत जाधव, जळगाव
जोपर्यंत कच्च्या तेलाचे भाव वाढणार नाहीत तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सिंथेटिक कापडाचा उठाव कमी होऊन सुताच्या कापडाची मागणी वाढणार नाही. अर्थातच आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराची भिस्त कच्च्या तेलावर आहे. अमेरिकेसह ब्राझीलही कच्चे तेलनिर्मितीकडे वळले आहे. कच्च्या तेलाची आताची किंमत ३७.६५ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.
सिंथेटिक कापड कच्च्या तेलापासून तयार केले जाते आणि कच्चे तेल स्वस्त असल्याने त्याची निर्मिती वाढली आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढले तर सिंथेटिक कापडही वधारेल व सुताच्या कापडास मागणी वाढून गिरण्या, जीनर्सना वाव मिळू शकेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराचे अभ्यासक तथा जयप्रकाश नारायण सूतगिरणीचे (शहादा) कार्यकारी संचालक आर.डी. पाटील यांनी दिली.
देशात मागील वर्षी ३६५ लाख गाठींचे उत्पादन झाले. पैकी ६५ लाख गाठींची निर्यात झाली. कापूस सल्लागार मंडळाने अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार देशात यंदा उत्पादन ३१० ते ३०० लाख गाठींवर येऊ शकते. उत्पादनात मोठी घट आहे; पण कच्च्या तेलाचा मुद्दा, युरो झोनचे संकट, चीनच्या कापूस धोरणातील बदल आदी कारणांमुळे देशातील सूतगिरण्यांनी रुईची गरज कमी केली आहे.