नौकेवरील चौघेही संशयित अतिरेकीच

By Admin | Published: January 6, 2015 02:55 AM2015-01-06T02:55:52+5:302015-01-06T02:55:52+5:30

सीमेवर शस्त्रसंधीभंगाच्या कुरापती सुरूच ठेवणाऱ्या पाकिस्तानने सागरी मार्गे दहशतवादी भारतात घुसविण्याच्या केलेल्या प्रयत्नावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नेमके बोट ठेवले

All the suspects are on the boat | नौकेवरील चौघेही संशयित अतिरेकीच

नौकेवरील चौघेही संशयित अतिरेकीच

googlenewsNext

पर्रीकरांचा दावा : तस्करांनी स्फोट घडवला नसता
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीभंगाच्या कुरापती सुरूच ठेवणाऱ्या पाकिस्तानने सागरी मार्गे दहशतवादी भारतात घुसविण्याच्या केलेल्या प्रयत्नावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नेमके बोट ठेवले. ३१ डिसेंबरच्या उत्तररात्री शक्तिशाली स्फोटके घेऊन भारतीय सागरी हद्दीत शिरलेली आणि स्फोटात नष्ट करण्यात आलेली नौका संशयित दहतशवाद्यांशीच संबंधित होती आणि त्यावरील चौघे पाकिस्तानी आरमारी अधिकारी आणि लष्कराच्या संपर्कात होते, असे पर्रीकर यांनी सोमवारी स्पष्ट केले़ या नौकेवर स्वार असणारे अमली पदार्थांचे तस्कर होते, हा दावा त्यांनी यावेळी खोडून काढला़
पाकिस्तानने मात्र या नौकेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता़ काँग्रेसनेही तटरक्षक दलाच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ या संपूर्ण पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी उपरोक्त खुलासा केला़ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या नौकेचा अतिरेक्यांशी संबंध असल्याचे उघड होते असे ते म्हणाले़ घेराबंदी केल्यानंतर नौकेवरील चौघांनी नौकेसह स्वत:ला उडवून दिले होते़ ते पाकिस्तानी नौदल अधिकारी, लष्कराच्या संपर्कात होते़ त्यांची नौका मासेमारी क्षेत्रात नव्हती़ ते चौघेही तस्कर असते तर त्यांनी वर्दळीच्या मार्गाची निवड केली असती़ पण त्यांची नौका निर्जन क्षेत्रात होती़ अर्थात त्यांचे मनसुबे काय होते, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, असे पर्रीकर म्हणाले़

भाजपाला हवे राहुल गांधींचे स्पष्टीकरण
संशयित पाकिस्तानी नौकेप्रकरणी काँग्रेस ‘घाणेरडे राजकारण’ खेळत असल्याचा आरोप भाजपाने केला असूनपाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या आपल्या नेत्यांचे काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी समर्थन करणार का, असा सवालही भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी सोमवारी केला.
तटरक्षक दलाने खोडला नौदलाचा दावा
संशयित पाकिस्तानी नौकेच्या टेहेळणी व पाठलागाच्या कारवाईबाबत काहीच कल्पना नव्हती, हा भारतीय नौदलाचा दावा तटरक्षक दलाने साफ फेटाळून लावल्याचे लोकमतचे प्रतिनिधी डिप्पी वांकाणी यांनी मुंबईहून दिलेल्या विशेष वृत्तात नमूद केले आहे. 
पश्चिम नौदल कमांडला या संपूर्ण कारवाईची पुरती पूर्वकल्पना होती आणि तटरक्षक सातत्याने त्यांच्या संपर्कातही होते, असे तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चौघा संशयितांना स्फोटकांसह वाहून आणणारी पाकिस्तानी नौका भारतीय हद्दीत आणखी पुढे आली तर तिचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र तटरक्षक दलाची लढाऊ नौका सज्ज ठेवण्यात आली होती, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. संशयित पाकिस्तानी नौकेच्या टेहेळणी व पाठलागाच्या कारवाईबाबत काहीच कल्पना नव्हती, हा भारतीय नौदलाचा दावा तटरक्षक दलाने साफ फेटाळून लावल्याचे लोकमतचे प्रतिनिधी डिप्पी वांकाणी यांनी मुंबईहून दिलेल्या विशेष वृत्तात नमूद केले आहे. 


पाकच्या कुरापती सुरूच
जम्मू : शस्त्रसंधीचा भंग थांबवावा, या भारताच्या आवाहनानंतरही मुजोर पाकिस्तानच्या कुरापती थांबवलेल्या नाही़ पाकिस्तानने सोमवारी सांबा आणि कठुआ जिल्ह्णात आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्या आणि सीमावर्ती भागातील भारतीय गावांना लक्ष्य करीत उखळी तोफांचा मारा केला़ त्यात खोरा सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा(बीएसएफ) कॉन्स्टेबल देवेन्द्र कुमार हा जवान शहीद झाला़ गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या गोळीबारात चार जवान शहीद तर एक महिला मृत्युमुखी पडली होती़ भारतानेही पाकिस्तानच्या पाच रेंजर्सला ठार केले होते़ पाकच्या हल्ल्यात एक मुलगीही मारली गेली होती़ शस्त्रसंधीच्या सोमवारच्या प्रकारानंतर भारतीय सीमावर्ती भागातील ५७ गावांमध्ये राहणाऱ्या पाच हजारांवर अधिक लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने ११ गावांमधील सुमारे २५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले असून १८०० जणांनी मदत छावण्यांचा आश्रय घेतला आहे.

Web Title: All the suspects are on the boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.