दोन मिनिटांत कामकाज तमाम! गदारोळात वाहून जातेय अर्थसंकल्पीय अधिवेशन, फक्त १ तास ४२ मिनिटे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 06:21 AM2023-03-17T06:21:39+5:302023-03-17T06:22:29+5:30
महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून तसेच अदानी प्रकरणावरून संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलाच तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे संसेदेचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतच तहकूब करावे लागत आहे. त्यामुळे लोकसभा धावपटू उसेन बोल्टप्रमाणे वेगवान झाली की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
‘आमची लोकसभा उसेन बोल्टप्रमाणे वेगवान आहे. पहिल्या दिवशी ९ मिनिटांत, दुसऱ्या दिवशी ४ मिनिटांत, तिसऱ्या दिवशी ३ मिनिटांत आणि गुरुवारी २ मिनिटांत स्थगित!’ अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाली. कामकाज ठप्प होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे.
कामकाज फक्त १ तास ४२ मिनिटे
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसद ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान दहा दिवस चालली. त्यात लोकसभेने केवळ एक तास आणि ४२ मिनिटे किंवा ४.०९ टक्के वेळ विधीमंडळ कामकाजावर खर्च केला.
- लोकसभेने ९५.९१ टक्के वेळ गैर-संसदीय कामकाजावर खर्च केला. राज्यसभेने ९०.६ टक्के वेळ गैर-संसदीय कामकाजावर खर्च केला.
- लोकसभेतील सरासरी उपस्थिती ७५.८४ टक्के होती, जी राज्यसभेच्या तुलनेत किंचित चांगली होती. राज्यसभेत उपस्थिती ६८.२ टक्के होती.
मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न विचारला होता. ते भाषण कामकाजातून पूर्णपणे वगळण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण लक्ष विचलित करण्यासाठी आहे. सरकार आणि पंतप्रधान अदानींच्या मुद्द्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी एक संपूर्ण नाटक तयार केले आहे. ते मला संसदेत बोलू देणार नाहीत, असे दिसते. मुख्य मुद्दा हा आहे की, नरेंद्र मोदीजी आणि अदानीजी यांच्यात काय संबंध आहेत?’ त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास पंतप्रधान असमर्थ आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
काँग्रेस नेते भारतविरोधी शक्तींची भाषा बोलत आहेत. ‘राहुल गांधींच्या कृत्याचा निषेध केला नाही आणि त्यांनी माफी मागितली नाही, तर लोक लोकप्रतिनिधींना जाब विचारतील. - किरेन रिजिजू, केंद्रीय कायदामंत्री
सरकार विरोधकांना चिथावणी देत आहे. ‘ते अदानी प्रकरणावर आणि त्यांच्या अपयशांवर चर्चा टाळण्यासाठी संसदेचे कामकाज चालू देत नाही. राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"