सर्व व्यवहार होतील बोटांच्या ठशांनी!
By admin | Published: January 9, 2017 04:08 AM2017-01-09T04:08:04+5:302017-01-09T04:08:04+5:30
नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम
बंगळुरु : नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस यंत्रे कालबाह्य ठरून केवळ बोटांच्या ठशांनी पैशांचे सर्व व्यवहार करणे शक्य होईल, असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे.
येथे सुरु असलेल्या तीन दिवसांच्या प्रवासी भारतीय परिषदेत युवकांसाठी आयोजित केलेल्या ‘स्टार्टअअप्स अॅण्ड इनोव्हेशन्स’ यावरील चर्चासत्रात बोलताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा विश्वास व्यक्त केला.
कांत म्हणाले की, वित्तीय तंत्रज्ञान आणि सामाजिक नवविचार या दोन्ही बाबतीत सध्या मोठ्या सृजनात्मक विध्वसांचे वातावरण आहे. यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारताला खूप मोठी झेप घेणे शक्य होईल.
देशातील १०० कोटी नागरिकांची बोटांचे ठसे व डोळ््याच्या बाहुल्यांच्या नकला अशी बायोमेट्रिक माहितीचा खजिना असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. याचा वापर करून अलिकडेच सरकारने ‘भीम अॅप’ व ‘आधार’वर आधारित व्यवहार करण्याची यंत्रणा सुरु केली आहे. याचा संदर्भ देत कांत म्हणाले की, सन २०२० पर्यंत भारतीयांना कोणताही पैशाचा व्यवहार केवळ अंगठ्याचा (ठसा) वापरून अवघ्या ३० सेकंदात पार पाडणे शक्य होईल, तसे झाले म्हणजे ओघानेच क्रेटिड व डेबिट कार्ड, एटीएम व पीओएस यंत्रांची गरजच राहणार नाही. (वृत्तसंस्था)
अर्थव्यवस्था तिप्पट वाढेल
कांत म्हणाले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन खर्व डॉलरची आहे. य्पैकी दोन खर्व डॉलरची औपचारिक अर्थव्यवस्था आहे तर आणखी एक खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अनौपचारिक आहे. सध्या देशातील फक्त २ ते २.५ टक्के लोक कर भरतात. औपचारिक अर्थव्यवस्था वाढून जास्तीत जास्त लोक कर यंत्रणेच्या कक्षेत आल्याखेरीज १० खर्व डॉलरचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. त्यासाठी डिजिटल व्यवहारांखेरीज तरणोपाय नाही.