सर्व टीव्ही चॅनेल्सच्या नूतनीकरणात सूट
By Admin | Published: November 12, 2016 02:27 AM2016-11-12T02:27:13+5:302016-11-12T02:27:13+5:30
टीव्ही चॅनल्सच्या नूतनीकरणासाठी वार्षिक नूतनीकरण नियमात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली
नवी दिल्ली : टीव्ही चॅनल्सच्या नूतनीकरणासाठी वार्षिक नूतनीकरण नियमात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली. अंतिम मुदतीच्या ६० दिवस अगोदर केवळ वार्षिक परवानगी शुल्क भरून हे चॅनल प्रसारण सुरू ठेवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक विषयांच्या संपादकांच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले की, कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चॅनलची वार्षिक नूूतनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे समाप्त केली आहे. ज्या प्रसारकांना अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगची स्वीकृती देण्यात आली आहे ते ड्यू डेटच्या ६० दिवस अगोदर वार्षिक परवानगी शुल्क भरून चॅनलचे प्रसारण सुरू ठेवू शकतात. पाचशे आणि हजारच्या नोटांबाबत बोलताना नायडू म्हणाले की, ‘तन, मन आणि धन’च्या संदर्भात स्वच्छ भारत साकार करण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत. सरकार सत्तेवर आल्यापासून काळ्या पैशांविरुद्ध पाऊल उचलत आहे. सरकारने कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी एक एसआयटी स्थापन केली. त्यानंतर सरकारने मॉरिशससारख्या देशांसोबत काही करार केले. उत्पन्नाची घोषणा करण्याचा नियम आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.