नव्या वर्षात सर्व वाहने महागणार!

By admin | Published: December 31, 2014 02:26 AM2014-12-31T02:26:29+5:302014-12-31T02:26:29+5:30

नवीन वर्षात स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत.

All vehicles will be expensive in the new year! | नव्या वर्षात सर्व वाहने महागणार!

नव्या वर्षात सर्व वाहने महागणार!

Next

अबकारी करसवलत मागे : ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी मोजा अधिक पैसे
नवी दिल्ली : नवीन वर्षात स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. या उत्पादनांना ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अबकारी करात देण्यात आलेल्या सूट योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने एक जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. या निर्णयामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल.
स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन क्षेत्राला यापुढे सरकार अबकारी करात सवलत देणार नाही, असे अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल. सध्या सरकारपुढे आर्थिक तूट सकल देशी उत्पादनाच्या ४.१ टक्के करण्याचे लक्ष्य असून, त्या दिशेने हा निर्णय मदत करू शकेल. आर्थिक वाढीचा वेग मंदावल्यामुळे अडचणीत आलेल्या या दोन क्षेत्रांना यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ही सवलत यावर्षी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात दिली होती. ही सवलत कार्स, एसयूव्ही, दुचाकी वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांना मिळत होती. अबकारी कर छोट्या कार्स, स्कूटर्स, मोटारसायकल्स व व्यावसायिक वाहनांना १२ टक्क्यांऐवजी ८ टक्के दिला गेला होता. एसयूव्हीसाठी हा कर ३० टक्क्यांवरून २४ टक्के करण्यात आला होता. मध्यम आकाराच्या कार्सना २४ वरून २० व मोठ्या कारना २७ वरून २४ टक्के करसवलत दिली गेली होती. ग्राहकोपयोगी उत्पादनांना १२ टक्क्यांवरून १० टक्के अबकारी कर लावण्यात आला होता.
जून महिन्यात मोदी सरकारने अबकारी करातील ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. सरकारच्या या निर्णयाची औपचारिक माहिती कंपन्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला उत्पादनांच्या किमती किती वाढवायच्या याचा निर्णय घेता आलेला नाही, असे होंडा कार्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग अँड सेल्स) ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले. सेन म्हणाले, की या निर्णयामुळे किमती वाढतील आणि या निर्णयामुळे काही कालावधीसाठी मागणीवरही परिणाम होईल. अशीच प्रतिक्रिया व्यक्त करताना मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले, की हा सरकारचा निर्णय असून तो स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याचा विक्रीवर परिणाम होईल व काही काळासाठी का होईना विक्री घटेल.

सरकारच्या निर्णयामुळे येणारे ओझे ग्राहकांवर ढकलण्याची वेळ आली आहे व विक्रीवरही परिणाम होईल, असे ग्राहकोपयोगी उत्पादकांनी म्हटले. अबकारी करात वाढ झाल्यामुळे सगळ्या उद्योजकांना किमती वाढविण्याशिवाय पर्याय नसेल, असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अ‍ॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे एरिक ब्रॅगन्झा यांनी सांगितले.

2015 च्या पहिल्या तीन महिन्यांत चांगली विक्री होईल, अशी आमची अपेक्षा होती; परंतु सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा हिरमोड होईल, असे ते म्हणाले. ब्रॅगन्झा हे हायर इंडियाचे अध्यक्षही आहेत. सलग दोन वर्षे मंदी अनुभवलेल्या वाहन बाजारपेठेला या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान १०.०१ टक्के सूट मिळाली होती.

Web Title: All vehicles will be expensive in the new year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.