अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:52 PM2022-06-06T16:52:51+5:302022-06-06T16:59:31+5:30
सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्न म्हटलं की विविध किस्से हे आले. लग्नातील भन्नाट गोष्टी, हटके व्हिडीओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे. जवळपास 20 दिवसांपासून घरामध्ये वीज नसल्यामुळे हैराण झालेल्या चार नववधू आपल्या माहेरी गेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या यमुनापारच्या घूरपूर येथील भीटा वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या इरादतगंज गावात ही अजब घटना घडली आहे. दोन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात 17 मे रोजी 25 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता. गावकऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर 22 मे रोजी तक्रार दाखल केली. पण ठरलेल्या वेळेत नवा ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नाही. गावकरी सतत ट्रान्सफॉर्मर बदलण्याची विनंती करीत होते. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नव्हता.
इरादतगंज गावात वीज ठप्प झाल्यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. मात्र सर्वाधित त्रास नववधुंना होत होता. 20 दिवसांपूर्वी या गावात लग्न करून आलेल्या 2 जणींनी माहेरी फोन करून नातेवाईकांना बोलावलं तर 8 दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या दोन तरुणींनाही सहन झालं नाही आणि त्यांनी वीज नसल्याने वडिलांना बोलावलं आणि त्या माहेरी निघून गेल्या आहेत.
लग्नानंतर काही दिवस तरुणी सासरी राहत होत्या. त्याच्या काही दिवसांनंतर नववधू काही दिवसांसाठी माहेरी जाते. मात्र वीज नसल्याने त्या त्रस्त झाल्या. उकाड्यामुळे हैराण झाल्या. नवरी सासरी आल्यानंतर अनेक विधी केले जातात. मात्र वीज नसल्यामुळे कोणतेच विधी होऊ शकले नाही. विधी होण्याच्या आधीच गावातील चार नववधू माहेरी परतल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.