अलाहाबादमध्ये सपा आणि अभाविप
By Admin | Published: October 2, 2016 12:41 AM2016-10-02T00:41:34+5:302016-10-02T00:41:34+5:30
अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी प्रणित समाजवादी छात्र सभा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) वरचष्मा दिसून
अलाहाबाद : अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी प्रणित समाजवादी छात्र सभा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) वरचष्मा दिसून आला. अभाविपने अध्यक्षपदही पटकावले.
मात्र, गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा अभाविपची ताकद घटली आहे. गेल्या वेळी अभाविपने अध्यक्षपद वगळता सर्व जागा जिंकल्या. यावेळी मात्र पदाधिकारीपदी त्यांचे कमी प्रतिनिधी निवडून आले. सपाछात्र सभेने यंदा मोठी मुसंडी मारली आहे.
गेल्या पाच वर्षांत प्रथमच अभाविपचा उमेद्वार अध्यक्षपदी निवडून आला. सपा छात्र सभेचे आदिल हमजा आणि शिवबालक यादव हे अनुक्रमे उपाध्यक्ष आणि सरचिटणीसपदी निवडून आले आहेत. अभाविपचा अभिषेक कुमार पांडे उर्फ योगी हा सहसचिवपदी तर छात्रसभेचा मनीष कुमार सैनी सांस्कृतिक सचिवपदी निवडून आला आहे.
या निवडणुकीत एकही महिला उमेदवार पदाधिकारीपदी निवडली गेली नाही. गेल्या वर्षी रिचा शर्मा ही अध्यक्षपदी निवडून आल्यामुळे विद्यार्थीनींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विशेष म्हणजे रिचा शर्मा ही अलाहाबाद विद्यापीठाची पहिली महिला अध्यक्ष ठरली होती. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ती अपक्ष म्हणून विजयी झाली होती.
गेल्या निवडणुकीत अभाविपची लाट विद्यापीठात होती. सगळे पदाधिकारी अभाविपचेच निवडून आले होते. एकटी रिचा शर्मा अपक्ष असूनही अध्यक्षपदी निवडून आली होती. त्यामुळे अभाविपच्या विजयावर काही प्रमाणात विरजन पडले होते. (वृत्तसंस्था)
तिसरा धक्का
अध्यक्षपदी अभाविपचा उमेदवार निवडून आला असला तरी पदाधिकारी म्हणून सपाचे अनेक जण निवडून आले आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातही यावर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र दिल्ली विद्यापीठात अभाविपचा प्रभाव यंदाही कायम राहिला. अलाहाबाद विद्यापीठात विजयासाठी अभाविपने सारी ताकद पणाला लावली होती.