‘जय भीम’ चित्रपटात वन्नियार समाजाच्या बदनामीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:18 AM2021-11-16T06:18:08+5:302021-11-16T06:19:13+5:30
अभिनेता, दिग्दर्शकाला वन्नियार संगमची कायदेशीर नोटीस
चेन्नई : ‘जय भीम’ चित्रपटातील बदनामीकारक दृश्ये काढून टाकून विना अट माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस वन्नियार संगमच्या तमिळनाडू राज्य अध्यक्षांनी अभिनेते सूरिया आणि चित्रपटाचे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानावेल यांना दिली आहे. दृश्ये बदनामी होईल अशी डब केल्याचा आरोप आहे. या चित्रपटाशी जे कोणी संबंधित आहेत त्यांनी वन्नियार समाज आणि त्याच्या लोकांविरोधात खोटी, द्वेषभावनेची आणि बदनामीकारक वक्तव्ये करणे थांबवावे किंवा प्रकाशित करणे थांबवावे असेही या नोटिशीत म्हटले असून ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागण्यात आली आहे.
चित्रपटात दाखवण्यात आलेले प्रसंग हे खऱ्याखुऱ्या जगण्यातील घटनांवर आधारित असले तरी राजकन्नूचा छळ करणारा पोलीस हा हेतूत: वन्नियार जातीचा दाखवण्यात आला आहे, असाही आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. आमच्या पक्षकाराने म्हटले आहे की, तुम्ही चित्रपटात खऱ्या घटनेतील खऱ्या पात्रांची खरी नावे कायम ठेवली आहेत. परंतु, उपनिरीक्षकाचे नाव तुम्ही हेतूत: बदलले आहे. खऱ्या कथेत कच्च्या कैद्याच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूमध्ये गुंतलेला उपनिरीक्षक हा अँन्थोनीस्वामी असून तो धर्माने ख्रिश्चन आहे, असे ही नोटीस म्हणते.
काय केले आहेत आरोप?
n चित्रपट निर्मात्यांनी मुद्दाम एका दृश्यात उपनिरीक्षक हा वन्नियार आहे हे दाखवण्यासाठी वन्नियार संगमशी संबंधित प्रतीक ‘अग्नी कुंडम’ दिनदर्शिकेसह ठेवले, असेही आरोप नोटिशीत करण्यात आले आहेत.
n वन्नियार संगमच्या सदस्यांची बदनामी करण्याच्या आणि संपूर्ण वन्नियार समाजाच्या प्रतिष्ठेची हानी करण्याच्या दुष्ट हेतूने हे करण्यात आले, असा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.
n वन्नियार समाजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून अभिनेता सूरिया आणि पट्टाली मक्काल काटची (पीएमके) यांच्यातील संघर्ष १४ नोव्हेंबर रोजी वाढला.
n राज्यात मायिलादुथुराई जिल्ह्यात सूरिया यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन पीएमकेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले.