इशरत प्रकरणी सीबीआयने छळ केल्याचा माजी उपसचिवांचा आरोप
By admin | Published: March 2, 2016 04:11 PM2016-03-02T16:11:46+5:302016-03-02T16:11:46+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयातील माजी उपसचिव (अंतर्गत सुरक्षा) आर व्ही एस मनी यांनी इशरत जहाँ प्रकरणी आपला छळ केला गेल्याचा आरोप केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २ - केंद्रीय गृहमंत्रालयातील माजी उपसचिव (अंतर्गत सुरक्षा) आर व्ही एस मनी यांनी इशरत जहाँ प्रकरणी आपला छळ केला गेल्याचा आरोप केला आहे. आर व्ही एस मनी यांनी सीबीआयने सिगरेटचे चटके दिल्याचा तसंच जाणुनबुजून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. सीबीआय अधिकारी सतीश वर्मा यांनी आपला छळ केल्याचा आरोप मनी यांनी केला आहे. इशरत जहाँ प्रकरणी प्रतिज्ञापत्र तयार करण्याची जबाबदारी मनी यांच्यावर होती.
इशरत जहाँ प्रकरणी गृहमंत्रालयाने सादर केलेल्या दोन्ही प्रतिज्ञापत्रात मनी यांच्या नावाचा उल्लेख आहे. गुजरात उच्च न्यायालयात 2009मध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. मी फक्त एकच प्रतिज्ञापत्र तयार केलं होतं, 6 ऑगस्टला हे प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आलं होतं. या प्रतिज्ञापत्रात इशरत जहाँ 'लष्कर ए तोयबा'ची दहशतवादी असल्याची माहिती देण्यात आली होती, असं मनी यांनी सांगितलं आहे. मात्र पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आलं ज्यामध्ये इशरत जहाँ 'लष्कर ए तोयबा'ची दहशतवादी असल्याचा कोणताही उल्लेख नव्हता अशी माहिती मनी यांनी दिली आहे.
मी पहिले प्रतिज्ञापत्र सादर केले होते ज्याला गृहमंत्रालय आणि गृहसचिवांनी संमती दिली होती, असं असताना दुस-या प्रतिज्ञापत्राची गरज काय होती ? असा सवाल मनी यांनी विचारला आहे. गुप्तचर यंत्रणांनी टाकलेल्या दबावामुळे आपण पहिले प्रतिज्ञापत्र तयार केले असं सांगण्यासाठी सीबीआय दबाव टाकत होती असा आरोप मनी यांनी केला आहे. मनी यांनी याप्रकरणी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारदेखील केली होती.