भाजपने तिकिटे विकल्याचा आरोप
By admin | Published: September 26, 2015 10:06 PM2015-09-26T22:06:55+5:302015-09-26T22:06:55+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पार्टीचे खासदार राजकुमार सिंह यांनी शनिवारी पक्षाकडून गुन्हेगारांना तिकिटे विकण्यात येत असल्याचा आरोप करून पक्षाला घरचा अहेर दिला
पाटणा/नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पार्टीचे खासदार राजकुमार सिंह यांनी शनिवारी पक्षाकडून गुन्हेगारांना तिकिटे विकण्यात येत असल्याचा आरोप करून पक्षाला घरचा अहेर दिला. दुसरीकडे भाजपाने हा आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळला आहे. परंतु विरोधी पक्षांनी मात्र सिंह यांचा आरोप अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माजी केंद्रीय गृहसचिव आणि आरा येथून प्रथमच लोकसभेवर निवडून गेलेले सिंह यांनी शनिवारी पाटण्यात सच्च्या कार्यकर्त्यांना डावलून गुन्हेगारांना तिकीट देण्यात येत असल्याचा आरोप करून पक्षाची चांगलीच फजिती केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर अशापरिस्थितीत
जंगलराज म्हणून कायम लक्ष्य करण्यात येणारे राजदचे लालूप्रसाद यादव आणि भाजप यांच्यात काय फरक राहिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गुन्हेगारांना पक्षात सामील करून घेण्यापूर्वीच तिकिटे देण्यात आली. हा बिहारच्या जनतेवर अन्याय असून यामुळे आपल्यासोबतही विश्वासघात झाला आहे. काही लोकांनी तिकिटे विकली. हे काय सुरू आहे? आम्ही स्वच्छ प्रशासन कसे देणार?
पक्षाची नाचक्की करणाऱ्या या वक्तव्यानंतरही सिंह यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कारवाईची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सिंग यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की, पक्षातर्फे सर्व पैलू विचारात घेऊन निष्पक्ष पद्धतीने तिकीट वाटप झाले आहे. बिहारचा जेथवर प्रश्न आहे तर राज्यात भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. आम्हाला बिहारच्या जनतेचा पाठिंबा आहे.
---------
बिहार निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी गुन्हेगारांना तिकीट वाटपाचा सिंह यांचा दावा सपशेल फेटाळून लावला. भाजपत वरिष्ठ नेत्यांसोबत विचारविनिमय केल्यानंतरच उमेदवार निश्चित केले जातात, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
पक्षातर्फे उमेदवारांची निवड करताना पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीचा अवलंब केला जातो, असा दावा भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी केला असून, पक्षशिस्त पाळण्याचे आवाहन त्यांनी सिंह यांना केले आहे.
आर.के. सिंह यांना लोजपाचा पाठिंबा
रालोआचा मुख्य घटक असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने भाजपा खासदार आर.के. सिंह यांच्या बिहारमध्ये कलंकित उमेदवारांना भाजपाचे तिकीट मिळत असल्याच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही लोजपने स्पष्ट केले.
सिंह यांच्या आरोपाने राज्यात रालोआच्या भवितव्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे लोजपा नेते चिराग पासवान यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)