भाजपा सरकारकडून खोट्या योजनांचे मार्केटिंग, रेश्मा पटेल यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 08:27 PM2019-03-16T20:27:31+5:302019-03-16T20:27:57+5:30
गुजरातमधील भाजपाच्या नेत्या रेश्मा पटेल यांनी भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. भाजपा आता केवळ एक मार्केटिंग कंपनी म्हणून राहिला असल्याचे रेश्मा पटेल यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद : गुजरातमधीलभाजपाच्या नेत्या रेश्मा पटेल यांनी भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. भाजपा आता केवळ एक मार्केटिंग कंपनी म्हणून राहिला असल्याचे रेश्मा पटेल यांनी म्हटले आहे. कधी काळी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वातील पाटीदार आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या रेश्मा पटेल यांनी आपला राजीनामा गुजरात भाजपा अध्यक्ष जीतू वघानी यांच्याकडे सोपविला.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी रेश्मा पटेल यांनी सध्या तरी आपण कोणत्याही पक्षात सामील होणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रेश्मा पटेल यांनी पोरबंदरहून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपा आता केवळ मार्केटिंग कंपनी बनला आहे. आम्हाला सरकारच्या खोट्या योजना आणि खोट्या धोरणांची मार्केटिंग करून जनतेला मूर्ख बनविण्यास सांगितले जात होते. हे मी करू शकत नव्हते, तसेच कोणावर नियमित अन्याय होताना पाहू शकत नाही. त्यामुळे हुकूमशाही नेत्यांपासून मी स्वत:ला मुक्त करून घेत पक्षाचा राजीनामा दिल्याचे रेश्मा पटेल यांनी सांगितले.
२०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात रेश्मा पटेल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी हार्दिक पटेल यांना'काँग्रेसचे एजंट' म्हणून संबोधले होते. त्यावेळी भाजपाने रेश्मा पटेल यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली होती. परंतु काही काळानंतर रेश्मा पटेल यांनी भाजपाच्या अनेक धोरणांवर टीका केली होती.