काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 08:47 PM2019-02-18T20:47:49+5:302019-02-18T20:48:54+5:30

शिवसेना-भाजपाने अखेर आज युतीची घोषणा केली

alliance with the bjp based on Ideology says shiv sena chief uddhav thackeray | काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे

काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना-भाजपामधील युतीचं घोडं अखेर आज गंगेत न्हालं. भाजपा अध्यक्ष अमित शहा युतीच्या अंतिम चर्चेसाठी आज मुंबईत आले होते. यानंतर दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली. काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?, असा सवाल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मध्यंतरी दोन्ही पक्षांमध्ये काही गैरसमज झाले. मात्र आता आम्ही नव्यानं सुरुवात करत आहोत, असंदेखील ते म्हणाले. शिवसेना-भाजपा युती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. दोन्ही पक्षांचं धोरण एक आहे. त्यामुळे आता मतभेद नको. अन्यथा इतरांचं फावेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढल्यास त्याचा लाभ इतर पक्षांना होईल आणि देशाला, राज्याला पुन्हा भोगावं लागेल. काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी एकत्र यायला काय हरकत काय,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तमाम हिंदू याच क्षणाची वाट पाहत होता, असा दावादेखील उद्धव यांनी पत्रकार परिषदेत केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद घेतला. 'निवडणुका येत जात असतात. मात्र युतीचं नातं 30 वर्षे जुनं आहे,' असं ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरदेखील भाष्य केलं. 'अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला होता. त्यांनी कर्जमाफी दिली. मात्र यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. प्रधानमंत्री फसल बिमा योजना चांगली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडून हफ्ता घेण्यात आला. मात्र त्यांना नुकसान भरपाईच मिळाली नाही,' असं उद्धव म्हणाले. 

राम मंदिर ही देशाची ओळख असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. 'राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या ठिकाणचा कारभार चांगला असेल, तर तिथे रामराज्य आहे, असं आपण म्हणतो. त्यामुळे राम मंदिराची उभारणी होणं गरजेचं आहे,' असंदेखील ते म्हणाले. यावेळी उद्धव यांनी नाणार प्रकल्पाला दिलेल्या स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. नाणार प्रकल्पाची जागा बदलली जाईल. हा प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल. ज्या भागातील जनता या प्रकल्पासाठी जमिनी द्यायला तयार होईल, त्याच भागात हा प्रकल्प होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं उद्धव यांनी सांगितलं.
 

Web Title: alliance with the bjp based on Ideology says shiv sena chief uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.