भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आघाडी झाल्याने चीन टेंन्शनमध्ये, कोणाला टार्गेट न करण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 12:48 PM2017-11-06T12:48:15+5:302017-11-06T12:59:36+5:30
मनिलामध्ये होणा-या पूर्व आशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार देश एकत्र येऊन चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली - मनिलामध्ये होणा-या पूर्व आशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार देश एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. हे चार देश एकत्र येत असल्याने चीन सध्या चिंतेमध्ये आहे. आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना झाली आहे. जवळपास दशकभरापासून या चार देशांमध्ये खंडीत झालेली चर्चा पुन्हा सुरु होणार आहे. येत्या 13 नोव्हेंबरला मनिलामध्ये पूर्व आशिया परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहू शकतात.
या बैठकीमुळे कुठल्या तिस-या पक्षाच्या हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आशियाच्या दौ-यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी जपानमध्ये दाखल झाले. या चार देशांच्या चर्चेची कल्पना 2007 मध्ये मांडण्यात आली होती. पण त्यानंतर यामध्ये फार काही प्रगती झाली नाही. भारतासमोर देशांतर्गत अनेक आर्थिक आव्हाने आहेत. त्यामुळे भारत आशियाच्या विकासात थोडेफार योगदान देईल असे चिनी तज्ञ लियान दीगुई यांनी सांगितले. ते शांघाय इंटरनॅशनल स्टडीज विद्यापीठातील प्राध्यापक आहेत.
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने योग्य समन्वय साधून पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये तसेच आर्थिक विकासामध्ये योगदान दिले तर त्यांचे स्वागतच आहे. पण हे चारही देश मनात कुठला पूर्वग्रह ठेऊन आले त्यांच्या मनात वैराची भावना असेल तर ते स्थैर्य निर्माण करु शकत नाहीत असे लियान यांनी ग्लोबल टाइम्समधल्या लेखात म्हटले आहे.
डोकलामवरुन भारतबरोबर झालेला वाद
दोन महिन्यांपूर्वी डोकलामच्या मुद्यावरुन चीन आणि भारताचे लष्कर समोरासमोर उभे होते. यावेळी चीनकडून दादागिरीचा भरपूर प्रयत्न झाला. सरकारी मालकीच्या वृत्तपत्रातून भारताला भरपूर धमक्या देण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारचाने ना युद्धाची भाषा केली, ना आपले सैन्य मागे घेतले. भारताच्या या खंबीर भूमिकेमुळे अखेर चीनला माघार घ्यावी लागली. भारताबरोबर आपल्याला युद्ध परवडू शकत नाही हे चीनच्या कळून चुकले आहे तसेच दक्षिण चीन समुद्रातही चीनसमोर अनेक देशांचे आव्हान आहे. त्यामुळे चीनने आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर जोर दिला आहे.