महाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 06:37 PM2018-05-24T18:37:28+5:302018-05-24T18:37:28+5:30
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र युती झाल्यास त्याचा फायदा
नवी दिल्ली - सरकारमध्ये एकत्र असूनही भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र युती झाल्यास त्याचा फायदा भाजपालाच अधिक होईल, तर सेनेचे मात्र नुकसान होईल, असेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
केंद्रातील मोदी सरकारला 26 मे रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबरोबरच आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, विविध संस्थांमार्फत जनमताच्या कलाचे सर्व्हेही प्रसिद्ध होऊ लागले आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यास या युतीला 48 टक्के मते मिळतील. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 40 टक्के मते मिळतील. 2014 च्या तुलनेत युतीच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे. मात्र आघाडीच्या मतांमध्ये 5 टक्क्यांनी घसघशीत वाढ होऊ शकते.
मात्र या सर्व्हेमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात युती झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेपेक्षा भाजपालाच अधिक होताना दिसत आहे. युती झाल्यास भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत दोन टक्क्यांनी वाढ होऊन भाजपाला 29 टक्के मिळतील, दुसरीकडे युती झाल्यानंतरही शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गतवेळच्या 24 टक्क्यांवरून शिवसेनेची मतांची टक्केवारी 19 टक्क्यांवर घसरण्याचा अंदाज आहे.