"युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण..."; राहुल शेवाळेंनी युतीचा अणुबॉम्बच फोडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:16 PM2022-07-19T19:16:22+5:302022-07-19T19:16:57+5:30
भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. यासाठी दिल्लीत मोदींसोबत तासभर चर्चा देखील झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.
नवी दिल्ली-
शिवसेनेला राज्यात हादरा बसल्यानंतर दिल्लीतही १२ खासदारांनी आता शिंदे गटाला पाठिंबा देत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे असल्याचं जाहीर करण्यात आलं. पक्षाची भूमिका मांडताना राहुल शेवाळे यांनी यावेळी मोठा गौप्यस्फोट केला. भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. यासाठी दिल्लीत मोदींसोबत तासभर चर्चा देखील झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. ते दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
'उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले म्हणूनच हा निर्णय', राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट!
"उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत आलेले तेव्हा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खास दालनात बैठक झाली होती. तेव्हा युतीवर तासभर चर्चा झाली होती. आतापर्यंत भाजपा-शिवसेना युतीबाबत चारवेळा चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंनाही युती हवी होती. जून महिन्यात मोदींसोबत बोलणी झाली आणि जुलैमध्ये राज्यात भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या घटनेवर भाजपाचेही पक्ष श्रेष्ठी नाराज झाले होते. एकीकडे आपल्यासोबत युतीची बोलणी होतेय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. यामुळे भाजपाच्या पक्ष नेतृत्वात नाराजी झाली. नाहीतर तेव्हाच युती झाली असती. या सर्व बाबींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी आमच्यासमोर केला आहे", असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.
उद्धव ठाकरेंनीच युतीसाठी प्रयत्न करायला सांगितले!
"कित्येक वेळा उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं ते आम्हाला म्हणाले. मी स्वत: चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली गेली नाही. त्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतला आहे", असंही ते राहुल शेवाळे म्हणाले.