साधुग्राममध्ये आखाडयांना जागा वाटप सुरू
By admin | Published: July 10, 2015 09:26 PM2015-07-10T21:26:16+5:302015-07-11T01:38:01+5:30
सिंहस्थ कुंभमेळा : दोन दिवसात होणार सर्व जागांचे वाटप
सिंहस्थ कुंभमेळा : दोन दिवसात होणार सर्व जागांचे वाटप
पंचवटी : जागा वाटपावरून सुरू असलेला साधूमहंतांतील वाद विवाद मिटल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच तपोवन साधूग्राममध्ये आखाडे तसेच खालशांना जागा वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. दुपारपर्यंत जवळपास दिडशेहून अधिक जागांचे वाटप प्रशासन व आखाडयांकडून करण्यात आले आहे.
साधूग्राममधील सेक्टर २ अे मध्ये सकाळपासूनच जागा वाटप सुरू असल्याने विविध आखाडे तसेच खालशाच्या साधू महंतांनी मोठी गर्दी केलेली होती. जागांचे वाटप केल्यानंतर मार्किंग करून दिल्यानंतर तत्काळ त्या रिकाम्या जागेभोवती बांबू लाऊन सुतळीने जागेला कुंपण घालण्याचे काम सुरू होते. आखाडे तसेच काही खालशांना जागा वाटप करण्याचे काम बाकी असुन येत्या दोन दिवसात सर्वच जागांचे वाटप पूर्ण केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या आखाडयांना जागा वाटप करण्यात आल्या त्या आखाडेधारकांनी लागलीच त्या जागेभोवती आपापल्या आखाडयांचे फलक लावण्याचे काम केले आहे.
जागावाटपा दरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद विवाद झाला नाही मात्र जवळच्या खालशांशेजारी एकाला एक लागूनच जागा दिल्यास आम्ही सर्व जवळचे साधूमहंत एकत्र राहू असे म्हणत काही खालसेधारकांनी एकाला एक लागून जागा दयाव्यात अशी मागणी यावेळी केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जागावाटपाचे काम करण्यात आले त्यानंतर सर्व साधूमहंत भोजनासाठी गेले तर दुपारी चार वाजेनंतर पुन्हा जागा वाटप करण्याचे काम करण्यात आल्याचे दिगंबर आखाडयाचे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थापक महंत विश्वंभरदास महाराज यांनी सांगितले. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
सेक्टर दोन मध्ये राखीव प्लॉट
साधूग्राममध्ये जागा वाटप करतांना सेक्टर दोन मध्ये काही रिकामे प्लॉट राखीव ठेवण्यात आले आहे. आपतकालीन परिस्थितीत हे रिकामे प्लॉट उपयोगात येणार असल्याने ते राखीव ठेवणे गरजेचे आहे. राखीव जागा आखाडयांना दिली आणि नंतर पुन्हा ती जागा खाली करण्यास सांगितले तर वाद होण्याची शक्यता आहे हे वाद होऊ नये म्हणून अगोदर पासूनच काही प्लॉट राखीव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.