कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला परवानगी, केंद्राचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 04:51 AM2020-10-24T04:51:51+5:302020-10-24T07:05:56+5:30
या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे.
नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक हे संयुक्तरीत्या विकसित असलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी भारत बायोटेक कंपनीने केंद्र सरकारकडे २ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता.
या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. अॅस्ट्राझेनिसा लसीच्या भारतातील चाचण्यांचा दुसरा व तिसरा टप्पा सिरमच्या सहकार्याने पार पडत आहे.
आयव्हरमेक्टिन न देण्याचा निर्णय
पोटातील जंतांचा नाश करण्यासाठी देण्यात येणारे आयव्हरमेक्टिन या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारांत समावेश न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
रशियाच्या लसीचे प्रयोग 100
रशियाने बनविलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना लसीच्या भारतातील मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात १०० स्वयंसेवकांवर प्रयोग केले जाणार आहेत. भारतातील चाचण्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने होत आहे.
करणार अँटीबॉडीज विकसित
कोरोना विषाणूला निष्प्रभ करणाऱ्या अँटीबॉडीज विकसित करण्यासाठी इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सिन इनिशिएटिव्ह (आयएव्हीआय) ही स्वयंसेवी संस्था व सिरम इन्स्टिट्यूटने मर्क या अमेरिकी औषध कंपनीशी करार केला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ही घोषणा केली. आयएव्हीआय व स्क्रिप्स रिसर्च या संस्थांनी अँटीबॉडीजचा शोध लावला होता.