आलोक कुमार वर्मा सीबीआय संचालक
By admin | Published: January 20, 2017 06:29 AM2017-01-20T06:29:54+5:302017-01-20T06:29:54+5:30
दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांची गुरुवारी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड करण्यात आली.
नवी दिल्ली: दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांची गुरुवारी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड करण्यात आली. नीयत वयोमानानुसार वर्मा येत्या जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार होते. पण आता त्यांना सीबीआय संचालक म्हणून पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. या आधीचे संचालक अनिल सिन्हा गेल्या डिसेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिकामे होते व गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हंगामी संचालक म्हणून काम पाहात होते.
वर्मा हे १९७९ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. सीबीआय संचालक हे त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील २४ वे पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार व लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे यांच्या निवड समितीकडून ४५ पात्र उमेदवारांमधून वर्मा यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांचे नावही या पदासाठी स्पर्धेत होते.
आलोक कुमार वर्मा यांच्या दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदाच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात आम आदमी पक्षाच्या डझनभर आमदारांना अटक झाली होती. त्यावरून वर्मा हे केंद्राच्या (मोदी) हातचे बाहुले असल्याचे आरोप ‘आप’च्या नेत्यांकडून करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)