अस्थाना यांच्या चौकशीमध्ये अजित डोवाल यांनी केला हस्तक्षेप, सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:59 PM2018-11-19T19:59:19+5:302018-11-19T21:15:02+5:30
सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले.
नवी दिल्ली - सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले. वर्मा यांनी सोमवारी सिलबंद लिफाफ्यामधून आपले उत्तर सर्वोच्च न्यायालत सादर केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, राकेश अस्थाना यांच्या चौकशीमध्ये अजित डोवाल यांनी हस्तक्षेप केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट एका अधिकाऱ्याने केला आहे.
त्याआधीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्याची सूचना करून त्यावर वर्मा यांनी आपले म्हणणे न्यायालयात मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी मंगळवारीच होईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सोमवारी सुनावणीस सुरुवात झाल्यावर वर्मा यांचे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी या प्रकरणी उत्तर देण्यासाठी अजून काही अवधी देण्याची विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला.
दरम्यान, सीबीआयमधील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी असलेल्या राकेश अस्थाना यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी आपली बदली नागपूर येथे करण्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सिन्हा यांनी आपल्या याचिकेमधून सरकारकडून सीबीआयमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच अजित डोवाल यांनी अस्थाना यांची चौकशी सुरू असताना दोन वेळा तपास कार्य रोखण्यास सांगितल्याचा आरोपही सिन्हा यांनी केला आहे. दरम्यान, एका दलालाने चौकशीमध्ये गुजरातमधील खासदार आणि केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरिभाई पार्थिभाई चौधरी यांना काही कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही झाला आहे.