आलोक वर्मा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:18 AM2018-11-07T05:18:00+5:302018-11-07T05:18:17+5:30
सर्व अधिकार काढून घेऊन रजेवर पाठविण्यात आलेले ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीसह सर्व आरोपांचा केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सुरू असलेल्या चौकशीत ठामपणे इन्कार केला आहे.
नवी दिल्ली - सर्व अधिकार काढून घेऊन रजेवर पाठविण्यात आलेले ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीसह सर्व आरोपांचा केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सुरू असलेल्या चौकशीत ठामपणे इन्कार केला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कारवाईविरुद्ध वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली तेव्हा न्यायालयाने ‘सीव्हीसी’ला प्रलंबित चौकशी निवृत्त न्यायाधीश न्या. ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार वर्मा ‘सीव्हीसी’समोर हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे मांडताना स्वत:वरील सर्व आरोपांचे खंडन केले.
आपण जे काही केले ते आपले कर्तव्यच होते व त्यात बेकायदेशीर काहीच नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनुसार वर्मा यांनी आपल्या बचावाचे सविस्तर लेखी निवेदनही सादर केले. वर्मा यांनी कुरेशीचा एजन्ट सतीश साना याच्याकडून तीन कोटी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप करणारी तक्रार ‘सीबीआय’चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केली होती. ती नंतर ‘सीव्हीसी’कडे पाठविली.