आळू की भाजी और धोती हुई गंगा....
By Admin | Published: May 6, 2016 04:30 PM2016-05-06T16:30:06+5:302016-05-06T16:30:06+5:30
लोकसभेत बोलताना मुद्द्यांपाठोपाठ मुद्दे मांडताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्या मराठीमिश्रित हिंदी म्हणींना खासदारांनी चांगलीच दाद दिली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ : आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीवर लोकसभेत बोलताना मुद्द्यांपाठोपाठ मुद्दे मांडताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्या मराठीमिश्रित हिंदी म्हणींना खासदारांनी चांगलीच दाद दिली. बोलता बोलता अचानक खाई त्याला खवखवे किंवा ज्याने अळूची भाजी खाल्ली त्यालाच खवखवते ही म्हण त्यांनी मराठीतून सांगितली. अळू हा शब्द ऐकताच सर्व सदस्यांना हिंदीमधील आलू (म्हणजे बटाटा) वाटल्याने त्यांना काहीच अर्थबोध झाला नाही. तेव्हा पर्रिकर यांनी आपका हिंदीवाला आलू नाही मराठीवाला आलू असे सांगून साक्षात सभापती सुमित्रा महाजन यांनाच त्याचे भाषांतर करण्याची विनंती केली.
अळू म्हणजे अलवी का पत्ता असे सांगताच सत्ताधारी सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि सर्वांनी बाके वाजवून त्यांना प्रतिसाद दिला. म्हणींच्या वापराची दुसरी घटना याच भाषणात पुन्हा एकदा झाली. एस.पी. त्यागी आणि गौतम खेतान हे लहान घोटाळेबाज आहेत त्यांनी फक्त वाहत्या गंगेत हात धुवून घेतले, पण गंगा कोठून सुुरू झाली आणि कोठे थांबते याचा आता शोध घ्यायचा आहे असे त्यांना म्हणायचे होते. यावेळी पर्रिकर यांनी सुरूवात केली, धोते हुए गंगामे.... तेव्हा त्यांच्यामागे बसलेल्या अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा आणि इतर सदस्यांनी त्यांचे वाक्य तात्काळ दुरूस्त केले आणि धोते हुए नव्हे बहते हुए गंगामे असे सांगितले. या प्रसंगालाही सत्ताधारी सदस्यांनी हसून दाद दिली. दोन दिवसांपुर्वी राज्यसभेतही मनोहर पर्रिकर बिरबल आणि बांबूची गोष्ट सांगितल्यावर संसदीय कार्यराज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह सर्वांनी बाके वाजवून त्यास पाठिंबा दशर्विला होता.