गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:09 PM2019-07-18T17:09:13+5:302019-07-18T17:09:51+5:30
२०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन युवा नेत्यांनी भाजपाला जेरीस आणले होते.
अहमदाबाद - गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज भाजपामध्ये प्रवेश केला. अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपाचेगुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अल्पेश ठाकोर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
Ahmedabad: Alpesh Thakor & Dhaval Singh Zala join Bharatiya Janata Party (BJP) in presence of Gujarat BJP President, Jitu Vaghani. pic.twitter.com/qgcHc6RvwT
— ANI (@ANI) July 18, 2019
२०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन युवा नेत्यांनी भाजपाला जेरीस आणले होते. या तिन्ही नेत्यांच्या झंझावाती प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही चिंता वाढली होती. तसेच त्याचा परिणाम निकालांमध्येही दिसला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली होती, तर भाजपाला काठावरच्या बहुमतावर समाधान मानावे लागले होते.
अल्पेश हे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, काँग्रेसमधील काही नेत्यांवर नाराज असल्याने ते काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
अल्पेश ठाकोर यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. परंतु त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही. त्यांच्याऐवजी जगदीश ठाकोर यांना तिकीट देण्यात आले होते. अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसकडे साबरकांठा लोकसभा जागेची मागणी केली होती, पण त्याकडेही काँग्रेसने दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता.