आधी आशेने पाठिंबा दिला, आता तुमच्या पराभवासाठी झटेन!, तीन वर्षांत घोर निराशा; राम जेठमलानींचे मोदींना रोखठोक पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:48 AM2017-09-12T01:48:13+5:302017-09-12T01:49:53+5:30
सन २०११ मध्ये भारताचे भावी पंतप्रधान म्हणून मीच सर्वात आधी तुमचे नाव सुचविले. ते पचनी न पडल्याने, भाजपाच्या त्या वेळच्या धुरिणांनी माझी पक्षातून बेकायदा हकालपट्टी केली. तरीही तुम्ही पंतप्रधान व्हावे, यासाठी मी झटत राहिलो, पण गेल्या तीन वर्षांच्या अनुभवाने माझी घोर निराशा झाली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या मूर्खपणाची आता मला लाज वाटत आहे.
नवी दिल्ली : सन २०११ मध्ये भारताचे भावी पंतप्रधान म्हणून मीच सर्वात आधी तुमचे नाव सुचविले. ते पचनी न पडल्याने, भाजपाच्या त्या वेळच्या धुरिणांनी माझी पक्षातून बेकायदा हकालपट्टी केली. तरीही तुम्ही पंतप्रधान व्हावे, यासाठी मी झटत राहिलो, पण गेल्या तीन वर्षांच्या अनुभवाने माझी घोर निराशा झाली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या मूर्खपणाची आता मला लाज वाटत आहे. त्यामुळे आता २०१९ मध्येच तुमचा लाजिरवाणा पराभव व्हावा, यासाठी चंग बांधण्याचा मी निर्धार केला आहे, असे रोखठोक पत्र ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
फक्त राम जेठमलानीच लिहू शकतात, अशा फर्ड्या इंग्रजीत व अत्यंत कडवट भाषेत. २३ आॅगस्ट रोजी लिहिलेले हे ९ पानी पत्र माध्यमांना उपलब्ध झाले आहे. या पत्राच्या सुरुवातीसच जेठमलानी मोदींना लिहितात की, गेल्या तीन वर्षांत तुम्ही घोर निराशा केली आहे आणि मित्र व नेता म्हणून तुमच्या अपयशाचे अधिकाधिक पुरावे दिवसागणिक समोर येत आहेत. त्यामुळे या अभागी भारतीय राष्ट्राने आपले भाग्य तुमच्या अयोग्य हाती देऊन चूक केली, असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.
पुरता भ्रमनिरास झाल्याने, आता तुमच्या पराभवासाठी झटण्याचे मी ठरविले आहेच. त्यासाठी परमेश्वर माझ्या बाजूने असल्याची पूर्ण खात्री बाळगा आणि पुन्हा सत्ता देण्याच्या आणाभाका भोळ््याभाबड्या जनतेला घालून, देशाची पुन्हा एकदा फसवणूक करू नका, असे आवाहनही जेठमलानी यांनी मोदींना केले आहे.
जेठमलानी यांनी या पत्रात मोदींच्या कथित अपयशाचा सविस्तर ऊहापोह केला आहे. परदेशातील भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनावर मोदींनी सत्ता मिळविली खरी, पण प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले न टाकता, उलट त्यांनी आणि त्यांच्या विश्वासू सहकाºयांनी यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांमध्ये होता होईतो खोडाच घातला, असा आरोप त्यांनी केला आहे.
कदाचित सुरुवातीस काळ्या पैशाविषयीची तुमची कळकळ प्रामाणिकही असेल, पण आता माझी खात्री झाली आहे की, मी पंतप्रधान म्हणून तुमचे नाव सुचविले, त्या वेळीही तुम्ही वरकरणी दाखविलेल्या तत्त्वांशी आधीच तडजोड केलेली होती. त्यामुळे तुम्हीही काळ्या पैशाविरुद्ध प्रामाणिकपणे न लढता, तुमच्या काही मित्रांंना व लाभार्थींना वाचवित आहात, या सुबुद्ध आणि चाणाक्ष लोकांच्या संशयास बळ मिळत आहे.
पापांचे प्रायश्चित्त घ्या
पक्षातून केलेल्या हकालपट्टीच्या बाबतीतही मोदींनी साळसूदपणे अनभिज्ञतेचा बुरखा पांघरला, असाही आरोप जेठमलानी यांनी
पत्रात केला आहे. नीतिमत्तेची थोडी जरी चाड असेल, तर मोदींनी या सर्व गोष्टींचा विचार करून, केल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असे भावनिक आवाहनही पत्राच्या शेवटी करण्यात आले आहे.
वकिलीतून घेतली निवृत्ती
९४ वर्षांच्या जेठमलानी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन वकिली व्यवसायातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे ७० वर्षांपूर्वी चढविलेला वकिलाचा डगला त्यांनी उतरवून ठेवला. मात्र, एक जागरूक नागरिक म्हणून कोणत्याही पक्षाचा मुलाहिजा न ठेवता, भ्रष्टाचार, काळा पैसा व लबाडी याविरुद्ध यापुढेही आपण आवाज उठवतच राहणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
फसून विश्वास टाकला
जेठमलानी मोदींना लिहितात की, काळ््या पैशाविरुद्ध माझ्या लढ्याचे कौतुक करण्याचे ढोंग तुम्ही केलेत. त्याला फसून मीही तुमच्यावर विश्वास टाकला. खरे तर मी भाजपा सोडून दुसºयांदा बाहेर पडलो होतो, पण मी पुन्हा पक्षात यावे, यासाठी तुम्ही व अमित शहा यांनी मला विनंती केली, पण आता माझ्या लक्षात येते आहे की, अमित शहांना खुनाच्या एका गंभीर खटल्यातून वाचविण्यासाठी मी तुम्हाला हवा होतो.