साध्या सरळ स्वभावाच्या रामनाथ कोविंदांची अशीही आठवण
By Admin | Published: June 19, 2017 05:18 PM2017-06-19T17:18:20+5:302017-06-19T19:02:47+5:30
अत्युच्च पदावर राहूनही तळागाळातल्या लोकांची दखल घेणारा, सुह्रद आणि यशाच्या शिखरावरही मातीशी नाळ न तोडणारी व्यक्ती ही आहे कोविंदांची ओळख...
>ऑनलाइन लोकमत, मुंबई
रालोआने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आणि मुंबई ठाणे परीसरातील कोळी बांधवांना आनंद झाला. केवळ कोळी समाजातील व्यक्ती राष्ट्रपती होणार म्हणून नाही, तर अत्युच्च पदावर राहूनही तळागाळातल्या लोकांची दखल घेणारा, सुह्रद आणि यशाच्या शिखरावरही मातीशी नाळ न तोडणारी व्यक्ती राष्ट्रपती होणार या भावनेतून.
ठाण्याच्या राकेश शांतीलाल पटेलांनी अशीच एक आठवण शेअर केली आहे. ठाण्यातील परेश कोळी यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या कोविंद यांच्या भेटिशी या आठवणीचा संदर्भ आहे. आधी दोन-तीनवेळा कोविंद यांच्याशी पटेल व कोळी यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या, परंतु ही 1994 च्या सुमारासची दिल्लीतली भेट विशेष ठरली. त्यावेळी रामनाथ कोविंद राज्यसभेत खासदार होते. आधी ठरल्याप्रमाणे, पटेल आणि कोळी दिल्लीत पोचले. दिल्लीला उतरल्यावर त्यांना वाटले की कोविंदसाहेबांनी कुणालातरी गाडी घेऊन पाठवले असेल. परंतु, बघतात तो साक्षात राज्यसभेचा खासदार त्यांना न्यायला गाडी घेऊन रेल्वे स्टेशनावर आला होता, तेदेखील मारूति 800 ही कार स्वत: चालवत. त्यांना गाडीत बसल्यावर कळलं की आज रविवार असल्यामुळे ड्रायव्हरची रजा आहे, आणि सुट्टीवर असलेल्या ड्रायव्हरला कशाला त्रास द्या किंवा स्नेहींना त्यांची सोय करायला कशाला सांगा असा विचार करत स्वत: खासदारसाहेब ड्रायव्हर झाले आणि पटेल व कोळींना त्यांनी साऊथ अॅव्हेन्यूला सोडलं. त्यांची नीट सोय लावून झाल्यावर कोविंदसाहेब निघून गेले. त्यांचा तो साधेपणा व अत्यंत सरळ वागणबोलणं यामुळेच ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोचले असल्याची भावना पटेल यांनी व्यक्त केली आहे.
कोळी समाजासाठी कटिबद्ध
कोळी समाजाचं कुठलंही काम असलं तरी कोविंद साहेब प्रोटोकॉल वगैरे बाजुला ठेवून समाजासाठी धाव घेतात असा कोळी समाजाचा अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई-ठाण्यामध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने असून ठाण्यामध्ये रामनाथ कोविंद अनेकवेळा आले आहेत.
एकदा तर कोविंद बिहारचे राज्यपाल झाल्यानंतरचा किस्सा स्थानिक नेते आवर्जून सांगतात. ठाण्यामधल्या एका कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. निमंत्रण मिळाल्यानंतर कुठल्याही प्रोटोकॉल वगैरेची फिकीर न करता कोविंद थेट ठाण्यात दाखल झाले. स्थानिक कार्यकर्त्यांनाही ते ठाण्यात थेट आल्यावरच समजले की कोविंदसाहेब आलेत म्हणून. त्यांनी साहेब आम्हाला आधी कल्पना तरी द्यायची म्हणजे नीट यायची सोय केली असती असे सांगितले. त्यावर अरे घरच्याच कार्यक्रमाला कशाला अशा गोष्टी करायच्या असा अविर्भाव कोविदांचा होता, अशी आठवण एका स्थानिक नेत्याने व्यक्त केली.
त्यामुळे, राज्यपालासारख्या पदावर राहूनही अत्यंत जमिनीवर पाय असलेल्या आणि जुन्या संबंधांना न विसरणाऱ्या कोविंदाची राष्ट्रपतीपदी निवड झालेली बघून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आणखी वाचा