देश होरपळला तरी मोदींना चिंता पंतप्रधानपदाचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:50 AM2018-04-24T03:50:46+5:302018-04-24T03:50:46+5:30
राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे
शीलेश शर्मा, नितीन अग्रवाल।
नवी दिल्ली : भले देश होरपळू दे, मुलींवर बलात्कार होऊदेत, दलित व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत असेल पण नरेंद्र मोदी यांचे सारे लक्ष पुन्हा पंतप्रधान बनण्याकडेच लागलेले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ‘राज्यघटना (संविधान) बचाव' या मोहिमेचा प्रारंभ करताना ते म्हणाले की, राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे. मात्र या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी करत असून संसदेतील कामकाजही बंद पाडले आहे.
देशातील विविध यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा भरणा केला जात आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, दलितांनी केलेल्या स्वच्छताकार्यामध्ये पंतप्रधानांना आध्यात्मिकतेचे दर्शन झाले. मात्र दलित, तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात अजिबात कणव नसल्याचे देशाने पाहिले आहे.
ही कुटुंब वाचवण्याची मोहीम : अमित शहा
‘संविधान बचाओ' मोहीम देशाला नव्हे तर स्वत:च्या कुटुंबाला वाचविण्यासाठी आहे अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. घटनेची मूल्ये काँग्रेसनेच पायदळी तुडवली आहेत. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात काँग्रेसनेच पुढाकार घेतला. देशातील प्रत्येक यंत्रणेला दुर्बल करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. राज्यघटनेच्या रक्षणाची भाषा करणाºया गांधी घराण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केला होता. तीच परंपरा आता राहुल गांधी चालवत आहेत असेही अमित शहा म्हणाले.
भाजपपासून बेटी ‘बचाओ'
राहुल गांधी म्हणाले की, रोजगाराच्या संधी तसेच अन्य गोष्टींबाबत गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी जनतेला भरभरून आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाहीत. आता येत्या लोकसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोदी नवीन आश्वासनांचा मारा करतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशी घोषणा मोदींनी दिली होती. पण भाजपा व त्याच्या नेत्यांपासूनच ‘बेटी बचाओ' म्हणण्याची वेळआहे.