हिंसाचारात रोहतक होरपळत असतानाही लष्कराने लावले दोघांचे लग्न
By admin | Published: February 25, 2016 10:07 AM2016-02-25T10:07:55+5:302016-02-25T11:19:40+5:30
जाट आंदोलनामुळे हरियाणातील रोहतक जळत असतानाही लष्कराचे जवान मदतीला धावल्याने एका जोडप्याचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले.
Next
>ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि, २५ - ओबीसी कोटयात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने हरियाणासह रोहतक शहर होरपळत असताना लष्कराचे काही जवान तेथील शीख परिवारासाठी अक्षरश: देवाच्या रुपात प्रकटले. संपूर्ण हरियाणात हिंसाचार सुरू असतानाही लष्कराच्या जवानांनी नेहा मक्कड या भावी वधूला तिच्या परिवारासह कडेकोट बंदोबस्तात गुरूद्वारेत नेऊन तिचे लग्न लावण्यास मदत केली.
गुरूचरणपुरा येथील रहिवासी असलेले सुरिंदर मक्कड यांची मुलगी नेहा हिचे २२ फेब्रुवारी रोजी त्याच शहरातील गौरव याच्याशी लग्न होणार होते, मात्र २० फेब्रुवारीपासूनच हरियाणातील जाट आंदोलनाला हिंसक वळण लागले. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असूनही शहरातील तणावामुळे हे लग्न पडेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलेले असतानाच उफाळलेल्या या हिंसाचारामुळे अवघ्या काही अंतरावर असलेल्या गुरूद्वारेत जाणेही शक्य नसल्याने मक्कड परिवार चिंताग्रस्त झाला.
मकक्ड कुटुंबियांची ही अडचण त्याच परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ३/५ गोरखा रायफल्स बटालियनच्या जवानांना समजली आणि त्यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. संपूर्ण शहर जळत असतानाही जवानांनी नेहासह तिच्या कुटुंबियांना सुखरूपरित्या गुरूद्वारेत पोहोचवले आणि ठरल्या दिवशी, ठरल्या वेळीच नेहा आणि गौरव विवाहबद्ध झाले.
लष्कराच्या जवानांच्या मदतीमुळे गौरवही अतिशय भारावला. ' या हिंसाचारात माझं दुकान जाळण्यात आलं, त्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र लग्न निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे मी थोडा निश्चिंत झालो असून आता नेहाच्या साथीने आयुष्याची नव्याने सुरूवात करण्यास मी सज्ज आहे,' असे त्याने सांगितले.
जाट आंदोलनाचा उत्तरेकडील राज्यांमधील रेल्वे सेवेला मोठा फटका बसला. सुमारे ७३६ रेल्वे रद्द केल्या तर, १०५ गाड्या अन्य मार्गाने वळत्या केल्या. रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकदारांना सुमारे २०० कोटींचा फटका बसला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर या राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील सेवा ठप्प झाल्या आहेत.