काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणं माहित असूनही जवान असहाय्य
By admin | Published: August 8, 2016 12:08 PM2016-08-08T12:08:36+5:302016-08-08T12:08:36+5:30
काश्मीर खो-यातील हिंसा, लोकांचा वाढत असलेला रोष आणि लष्करी बळाचा वापर करण्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे दक्षिण काश्मीर परिसरात पोलीस आणि सेना हतबल झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 8 - काश्मीर खो-यातील हिंसा, लोकांचा वाढत असलेला रोष आणि लष्करी बळाचा वापर करण्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे दक्षिण काश्मीर परिसरात पोलीस आणि सेना हतबल झाली आहे. पोलीस आणि लष्करासमोर खूप सारी आव्हानं आहेत. हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीचा खात्मा केल्यापासून खो-यामधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. इतकंच नाही तर दहशतवाद विरोधी मोहिमांनाही जबर धक्का बसला आहे.
'लोकांच्या जमावात लपून उपस्थित राहणा-या दहशतवाद्यांची आमच्याकडे माहिती आहे. मात्र सद्यपरिस्थितीत आम्ही काहीच करु शकत नाही', असं खो-यात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलांनी सांगितलं आहे. खो-यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले सुरु असलेले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची भीतीही त्यांना आहे. काश्मीरमध्ये मिळत असलेल्या समर्थनामुळे गेल्या काही दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी सभा आयोजित केल्या होत्या अशी सुत्रांची माहिती आहे.
'आमच्यासाठी हा गंभीर विषय आहे. वाढत्या तणावामुळे एका प्रकारच्या जहालमतवादी गटाला जन्म दिला आहे. आता आम्हाला शुन्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अगोदर लोक जहालमतवाद्यांना दूर ठेवत होते, पण आता दहशतवाद्यांना समर्थन मिळत आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद विरोधी कारवाया करणं कठीण आहे', असं एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार गुलमर्ग आणि कुपवाडा सेक्टरमधून 120 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबासोबत इतर दहशतवाद्यांचाही समावेश आहे.