परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला अल्टो कार, मतदारसंघातील विद्यार्थ्यांना सायकली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 04:51 PM2020-09-17T16:51:45+5:302020-09-17T16:52:14+5:30
जगरनाथ यांनी यापूर्वीच घोषणा केली होती, जॅक बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्टो कार गिफ्ट देण्यात येईल.
रांची - झारखंडचे शिक्षणमंत्री 2 ऑल्टो कार, एक मोटारसायकल आणि जवळपास 300 सायकलींची खरेदी केली आहे. झारखंड अकॅडमीक कॉन्सिलच्या (जॅक) परीक्षांच्या निकालाची घोषणा करत शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्स विद्यार्थ्यांना अल्टो कार देणार असल्याचं सांगतिलं. शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी दिलेला शब्द पाळत, लवकरच या कार, मोटारसायकल व सायकलींचे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.
जगरनाथ यांनी यापूर्वीच घोषणा केली होती, जॅक बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्टो कार गिफ्ट देण्यात येईल. त्यासोबतच, दहावीच्या परीक्षेत बोकारो जिल्ह्याशिवाय त्यांच्या डुमरी या विधानसभा मतदारसंघातील 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून पास होतील, त्यांना सायकल भेट देण्यात येईल. त्यानुसार, आता 303 विद्यार्थ्यांमध्ये अल्टो कार, सायकल आणि दुचाकीचे वाटप होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी रांची येथे राज्यातील टॉपर विद्यार्थ्याला अल्टो कार भेट देण्यात येईल, असे महतो यांनी सांगितले. झारखंड कोशरी विनोद बिहारी यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात हे बक्षीस देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी महतो यांनी बुधवारी अल्टो कार, दुचाकी आणि 300 सायकलींची खरेदी केली आहे. विद्यार्थ्यांना हे गिफ्ट देण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती जागरुकता आणि उत्कृष्ट गुणवत्तेला प्रोत्साहन देणे असल्याचं महतो यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी यंदा अकरावीला प्रवेश घेतला आहे.
अकरावीला प्रवेश
शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी वयाच्या 52 व्या वर्षी येथील देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयातील कला शाखेत इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे. राज्यशास्त्र हा विषय घेऊन ते आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत. शिक्षणाला वयाची अट नसते, तर दुसरीकडे मी केवळ दहावी पास असून 10 वी पास आमदाराला मंत्री केल्याची टीकाही माझ्यावर सातत्याने करण्यात येत होती. या टीकाकारांना उत्तर देण्याचं काम मी केलंय, असे मंत्री महतो यांनी म्हटलंय. दहावीनंतर राजकारणात उडी घेतल्याने आपले शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.