IIT Kanpur: माजी विद्यार्थ्याने आयआयटी कानपूरला दिली १०० कोटींची गुरुदक्षिणा, पाहा कोण आहे ही व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 12:45 PM2022-04-05T12:45:39+5:302022-04-05T12:46:17+5:30
IIT Kanpur: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुदक्षिणा देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मात्र एका विद्यार्थ्याने त्याने शिक्षण घेतलेल्या संस्थेला गुरुदक्षिणा म्हणून एवढी रक्कम दिली की तो आकडा वाचून आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही
नवी दिल्ली - आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुदक्षिणा देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मात्र एका विद्यार्थ्याने त्याने शिक्षण घेतलेल्या संस्थेला गुरुदक्षिणा म्हणून एवढी रक्कम दिली की तो आकडा वाचून आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. या विद्यार्थ्याने आयआयटी कानपूरला तब्बल १०० कोटी रुपयांची गुरुदक्षिणा दिली आहे. संस्थेला कुठल्याही माजी विद्यार्थ्याने दिलेली ही सर्वोच्च देणगी आहे. ही रक्कम स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विकासामध्ये मदत करण्यासाठी देण्यात आली आहे.
आयआयटी कानपूरला एवढी मोठी देणगी देणाऱ्या अब्जाधीश व्यावसायिकाचं नाव राकेश गंगवाल असं आहे. त्यांनी आयआयटी कानपूरला ही देणगी दिली आहे. या रकमेचा वापर कँपसमध्ये ५०० बेड असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठीही होणार आहे. या प्रोजेक्टवर सुमारे ६०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामधील ३५० कोटी रुपये आतापर्यंत जमवण्यात आले आहेत. आयआयटीचे निर्देशक प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितले की, राकेश गंगवाल यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत आमि एमओयूच्या माध्यमातून संस्थेमध्ये स्थापन करण्यात येत असलेले स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीला अजून उत्तम बनवण्यासाठी तसेच शोध कार्यांना प्रोत्साहन देण्यास मदत होणार आहे. सोमवारी मुंबईमध्ये झालेल्य एका कार्यक्रमात आयआयटी-कानपूर आणि राकेश गंगवाल यांच्यामध्ये एमओयू साईन करण्यात आला.
राकेश गंगवाल हे कोलकातामधील रहिवासी आहे. त्यानं १९७५ मध्ये आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनियरिंग केलं होतं. १९८० मध्ये ते एअर लाईन इंडस्ट्रीशी जोडले गेले. त्यानंतर इंडिगोचे को-फाऊंडर बनले. याआधी फ्लिपकार्टच्या बिन्नी बन्सल यांनीही आयआयटी दिल्लीला १०० कोटी रुपयांची रक्कम दिली होती.