बालाकोटसारखा एअर स्ट्राईक करण्याची कितपत तयारी?; हवाई दल प्रमुखांनी दिलेलं उत्तर 'लय भारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:28 PM2020-05-18T15:28:37+5:302020-05-18T15:38:56+5:30
सीमेवरील घडामोडींवर आमची नजर, गरज पडल्यास चोख प्रत्युत्तर; हवाई दल प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा
नवी दिल्ली: देश कोरोनाचा मुकाबला करताना हवाई दल सीमावर्ती भागासोबतच देशातही अतिशय सक्रियपणे काम करत आहे. हवाई दलाचे जवान संकटाच्या काळात अतिशय शांतपणे आपलं योगदान देत आहे. देशवासीयांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना हवाई दलाचं शत्रूराष्ट्रावरील लक्ष तसूभरही हललेलं नाही. शत्रूराष्ट्राकडून आगळीक झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यास हवाई दल पूर्णपणे तयारी असल्याचं हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितलं.
हिंदी वृत्तवाहिनी आज तकशी बोलताना हवाई दल प्रमुखांनी हवाई दलाच्या सध्याच्या तयारीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी बालाकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. बालाकोटसारखा एअर स्ट्राईक करण्यास आम्ही २४ तास सज्ज आहोत. मात्र आम्ही कारवाई करायची की नाही, हे शत्रूराष्ट्रावर अवलंबून आहे, असं हवाई दल प्रमुख म्हणाले. शत्रूराष्ट्राला भीती बाळगावी लागेल. कारण कारवाई कधी करायची ते आम्ही ठरवू. ते जोपर्यंत दहशतवाद पसरवणं बंद करत नाही, तोपर्यंत त्यांनी आमच्या कारवाईची चिंता करावी, असंदेखील हवाई दल प्रमुखांनी पुढे म्हटलं.
पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कृत्यांना आपलं सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यावर आमची नजर आहे. आपल्या देशात, आपल्या जमिनीवर जेव्हा जेव्हा दहशतवादी कारवाई होईल, तेव्हा तेव्हा त्यांना सावध राहावं लागेल. पाकिस्तानला भीती बाळगावी लागेल. कारण कारवाईची वेळ आम्ही ठरवू, अशा शब्दांत भदौरिया यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.
काही दिवसांपूर्वीच चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात हवाई ड्रॅगनच्या कुरापती पाहायला मिळाल्या. त्यावरही आपलं लक्ष असल्याचं हवाई दल प्रमुख म्हणाले. आवश्यकता भासल्यास नक्की कारवाई करू. दोन्ही सीमावर्ती भागांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आमची नजर आहे. कुठेही आगळीक दिसली तर आम्ही कारवाई करण्यास सज्ज आहोत, असं भदौरिया यांनी सांगितलं.
Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी
...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप
...तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; निर्मला सीतारामन यांच्या विधानावरुन आव्हाडांचा निशाणा