पंजाबमध्ये अमरिंदरच कॅप्टन!
By admin | Published: March 12, 2017 01:02 AM2017-03-12T01:02:40+5:302017-03-12T01:02:40+5:30
पंजाबमध्ये सत्तारूढ शिरोमणी अकाली दल आणि त्यांचा सहकारी भाजपाच्या काही कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
चंदीगढ : पंजाबमध्ये सत्तारूढ शिरोमणी अकाली दल आणि त्यांचा सहकारी भाजपाच्या काही कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसने येथे मोठा विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केले आहे आणि अमरिंदर सिंग हेच खऱ्या अर्थाने पंजाबचे कॅप्टन असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात आम आदमी पार्टी दुसऱ्या स्थानी आणि आतापर्यंत सत्तेत असलेली अकाली दल - भाजपा यांची आघाडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. बादल यांच्या घराणेशाहीलाही तेथील मतदारांनी नाकारले आहे.
पंजाबला बर्बाद करणाऱ्यांना हाकलले
अत्यंत वाईट दशा करून पंजाबला बर्बाद करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाची सत्ता उलथवून काँग्रेसच्या हाती सत्ता देणाऱ्या पंजाबच्या जनतेला धन्यवाद देत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अमलीपदार्थाच्या व्यसनातून मुक्त करण्याचा ठाम शब्द दिला. चार आठवड्यांतच ही समस्या निकाली काढली जाईल. या समाजघातकी अवैध धंद्यातील लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. धार्मिक ग्रंथाच्या अवमान करण्यात आल्याच्या घटनांची चौकशी केली जाईल. आम आदमी पार्टीलाही जवळ फटकू न देण्याचे शहाणपण दाखविणाऱ्या पंजाबच्या जनतेची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. केजरीवालांसारख्या वावटळी येतात आणि जातात, असे ते म्हणाले.
निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये सामील झालेले नवजोत सिंग सिद्धू यांना उपमुख्यमंत्री करणार का? यावर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सोनिया गांधी सध्या विदेशात आहेत. त्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेच याबाबतीत निर्णय घेतील. आम्ही आमच्या वतीने शिफारस करणार आहोत; परंतु, अंतिम निर्णय राहुलजी हेच घेतील. पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या, रविवारी बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.