Farmers Protests : "आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत आणि सरकारी नोकरी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 08:29 AM2021-01-23T08:29:02+5:302021-01-23T08:38:42+5:30

Farmers Protests : शेतकरी संघटनांनी कायद्यांना स्थगिती देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करायला हवी, असं सरकारकडून सांगण्यात आलं. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 

amarinder singh big announcement will give government job to family of those who died in farmer agitation | Farmers Protests : "आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत आणि सरकारी नोकरी"

Farmers Protests : "आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत आणि सरकारी नोकरी"

Next

नवी दिल्ली -  गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अकरा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता सरकार कठोर भूमिका घेताना दिसत आहे. 'दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला. हा आमच्याकडून दिला गेलेला सर्वोत्तम आणि अंतिम प्रस्ताव होता. यापुढे आमच्याकडून कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही', अशी भूमिका सरकारने घेतली आहे. सरकारने पुढील बैठकीसाठी कोणतीही तारीख दिली नसल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. शेतकरी संघटनांनी कायद्यांना स्थगिती देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करायला हवी, असं सरकारकडून सांगण्यात आलं. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 

शेतकरी आंदोलनातील 76 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या 76 जणांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने राज्यांचा सल्ला घेतल्याशिवाय हे कायदे बनवले आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. हे तीन कृषी कायदे लागू करून केंद्र सरकारला बाजार समित्या फोडायच्या आहेत, एमएसपी यंत्रणा बंद करायची आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे बनवण्यासाठी समिती स्थापन केली. पण त्यात पंजाबचा एकही सदस्य नव्हता असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात झालेल्या बैठकीनंतर शेतकरी संघटनांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले जावेत, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 'दीड वर्षांऐवजी दोन वर्षासाठी कृषी कायद्यांना स्थगिती देण्यावर चर्चा केली जाऊ शकते, असं सरकारकडून सांगण्यात आलं. शेतकऱ्यांना हा प्रस्ताव मान्य असल्यास उद्या चर्चा होईल, अशी सरकारची भूमिका आहे. सरकारकडून आणखी कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही,' असं शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकेत म्हणाले. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली होणारच, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

धक्कादायक! जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणत "त्याने" केली आत्महत्या 

कडाक्याच्या थंडीत अनेक दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विष घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिकरी बॉर्डरवर मंगळवारी एका शेतकऱ्याने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी त्याल तातडीने दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. जयभगवान राणा असं या शेतकऱ्याचं नाव असून ते हरियाणच्या रोहतकचे रहिवासी होते. ते गेल्या कित्येक दिवसांपासून ते आंदोलनात सहभागी झाले होते. विषारी पदार्थ खाल्ल्याअगोदर त्यांनी एक पत्र देखील लिहीलं आहे. जिवंत शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही कदाचित मृत्यूनंतर तरी ऐकतील म्हणूनच मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं शेतकऱ्याने म्हटलं आहे. 

Web Title: amarinder singh big announcement will give government job to family of those who died in farmer agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.