अरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकार, म्हणाले माझ्याकडे भेटायला वेळ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 06:25 PM2017-11-15T18:25:44+5:302017-11-15T18:35:03+5:30
चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते. याचा धूर वाऱ्याने दिल्लीपर्यंत येतो. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढते आहे.
दरम्यान, या दिल्लीतील या समस्येवर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमरिंदर सिंग यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र, अमरिंदर सिंग यांनी त्यांची मागणी धुडकावत माझ्याकडे एवढा वेळ नसल्याचे सांगितले. केजरीवाल हे प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या चर्चेतून काहीच साध्य होणार नाही, हे माहिती असूनही केजरीवाल त्याचा आग्रह का धरत आहेत, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
.@capt_amarinder Sir, I am coming to Chandigarh on Wed to meet Haryana CM. Would be grateful if u cud spare sometime to meet me. It is in collective interest
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 14, 2017
दिल्लीतून दहा वर्षे जुनी डिझेलवरील वाहने हटवा
दिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावल्यानंतर दिल्ली सरकारने संबंधित याचिका मागे घेतली. मात्र 10 वर्षे जुनी डिझेल वाहने रस्त्यांवरून तत्काळ हटविण्याचे आदेशही एनजीटीने दिले आहेत.
दुचाकींमुळे प्रदूषण
एका अहवालाचा हवाला देत हरित लवादाने स्पष्ट केले की, दुचाकी वाहनातून होणारे प्रदूषण हे चारचाकी वाहनातून होणाºया प्रदूषणापेक्षा अधिक आहे, मग आपण अशी मनमानी सूट कशी देऊ शकता.