"कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुलाची ईडी चौकशी थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले’’
By बाळकृष्ण परब | Published: December 14, 2020 03:36 PM2020-12-14T15:36:25+5:302020-12-14T15:37:12+5:30
Amarinder Singh News : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत. तर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी मुलावरील ईडीची केस मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठेवलेले उपोषण हे नाटक असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार आरोप केले. ईडीकडील केस माफ व्हावी यासाठी अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारसोबत सेटिंग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, कॅप्टनजी मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहे. मी दिल्लीतील स्टेडियमना जेलमध्ये परिवर्तीत होऊ दिलं नाही. केंद्र सरकारसोबत लढलो आहे. मी शेतकऱ्यांचा सेवेकरी बनून त्यांची सेवा करत आहे. तुम्ही तर तुमच्या मुलावरील ईडीची केस माफ व्हावी यासाठी केंद्र सरकारसोबत सेटिंग केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन विकले? पण का?
कैप्टन जी, मैं शुरू से किसानों के साथ खड़ा हूँ। दिल्ली के स्टेडीयम जेल नहीं बनने दी, केंद्र से लड़ा। मैं किसानों का सेवादार बनके उनकी सेवा कर रहा हूँ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 14, 2020
आपने तो अपने बेटे के ED केस माफ़ करवाने के लिए केंद्र से सेटिंग कर ली, किसानों का आंदोलन बेच दिया? क्यों? https://t.co/J3VzLgCI3M
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घोषित केला होता. तसेच नागरिकांनाही उपोषण करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांचे उपोषण म्हणजे नाटक आहे, असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला होता. तसेच अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले एक काम सांगा, असे आव्हानही अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही काम करण्याऐवजी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला.