अमरिंदर सिंग यांचा १६ मार्च रोजी शपथविधी
By admin | Published: March 13, 2017 04:20 AM2017-03-13T04:20:17+5:302017-03-13T04:20:17+5:30
पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग हे १६ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. अमरिंदरसिंग यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाचे काही सदस्यही त्याच दिवशी
चंदीगड : पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग हे १६ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. अमरिंदरसिंग यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाचे काही सदस्यही त्याच दिवशी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. अमरिंदरसिंग यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल व्ही. पी. सिंग बदनोर यांची भेट घेऊन राज्य सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर अमरिंदरसिंग हे दिल्लीला रवाना झाले.
कॅप्टन अमरिंदरसिंग हे आपल्या मंत्रिमंडळातील संभाव्य सदस्यांची यादी घेऊन दिल्लीला गेल्याचे समजते. तेथे काँग्रेसश्रेष्ठी या यादीवर शिष्कामोर्तब करतील. या यादीत नवज्योतसिंग सिद्धू आणि मनप्रितसिंग बादल यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे.
दरम्यान काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी चंदीगडच्या सेक्टर-१५ येथील पंजाब काँग्रेस मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कॅप्टन अमरिंदरसिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीला काँग्रेसच्या पंजाब प्रभारी आशा कुमारी उपस्थित होत्या. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्री बनतील, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे या बैठकीत केवळ औपचारिकता म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांची नेतेपदी निवड करण्यात आली.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या बळावर काँग्रेसने विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागा जिंकल्या आहेत.
तत्पूर्वी मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा सादर दिला. राज्यपालांनी बादल यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सल्ला दिला.
अकाली दल-भाजपाच्या पराभवाबद्दल बोलताना प्रकाशसिंग बादल म्हणाले, ‘युतीच्या पराभवाची समीक्षा केली जाईल. हा जनादेश आम्ही मान्य करतो.’ या निवडणुकीत अकाली दलाला केवळ १५ तर भाजपाला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यपालांनी बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर विधानसभा विसर्जित केली. आता नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी नव्या विधानसभेचे अधिवेशन १८ मार्च रोजी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.