Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ पुन्हा ढगफुटी; 4 हजार भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 07:51 PM2022-07-27T19:51:16+5:302022-07-27T19:51:53+5:30
Amarnath Cloudburst: यापूर्वी 8 जुलै रोजी अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली होती. त्या घटनेत सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला होता.
Amarnath Cloudburst: मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर असलेल्या भाविकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ भीषण ढगफुटी झाल्याची घटना घडली होती. तशीच घटना आज परत एकदा घडली आहे. सध्या अमरनाथ परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल आलेल्या मुसळधार पावसामुळे, कालपासून आतापर्यंत सुमारे 4000 यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
8 जुलै रोजी ढग फुटले
आजच्या ढगफुटीच्या घटनेने दोन आठवड्यांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. 8 जुलै रोजी बाबा बर्फानीच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली होती. या घटनेत सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाच्या Mi-17 V5 आणि चीतल हेलिकॉप्टरद्वारे 34 जखमी यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले होते. तसेच, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली होती.
जम्मू येथून 2100 भाविकांची तुकडी रवाना
जम्मूच्या भगवती नगर बेस कॅम्पमधून 2100 हून अधिक यात्रेकरूंची तुकडी मंगळवारी अमरनाथकडे रवाना झाली. सीआरपीएफच्या कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रेकरूंचा 26 गट मंगळवारी सकाळी 73 वाहनांच्या ताफ्यातून गुहेकडे निघाला. 26व्या तुकडीत एकूण 2,189 यात्रेकरूंचा समावेश आहे.