अमरनाथ पूजेचे दूरदर्शनतर्फे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, जुलैमध्ये यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 03:45 AM2020-06-26T03:45:53+5:302020-06-26T03:46:00+5:30
अमरनाथच्या गुंफेत दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास करण्यात येणाऱ्या पूजेचे भाविकांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी श्री अमरनाथजी देवस्थान मंडळाने दूरदर्शनकडे केली आहे.
श्रीनगर : अमरनाथ यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असून कोरोनाच्या साथीमुळे मोठ्या संख्येने यात्रेकरूंना सहभागी होण्यास परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे अमरनाथच्या गुंफेत दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास करण्यात येणाऱ्या पूजेचे भाविकांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी श्री अमरनाथजी देवस्थान मंडळाने दूरदर्शनकडे केली आहे.
हे प्रक्षेपण डीडी राष्ट्रीय व कामीरच्या डीडी कशीर या दोन वाहिन्यावर करण्यात यावे असेही या मंडळाने म्हटले आहे. श्रीनगर दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे प्रमुख जी. डी. ताहिर यांनी सांगितले की, श्री अमरनाथजी देवस्थान मंडळाची मागणी मान्य झाली तर अमरनाथ गुंफेतील पूजेचे थेट प्रक्षेपण होण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल. अमरनाथ यात्रेच्या वेळी चित्रित केलेले कार्यक्रम याआधीही दूरदर्शनवरून दाखविण्यात आले होते. मात्र या यात्रेतील प्रसंगांचे व पूजेचे थेट प्रक्षेपण आजवर कधीही झालेले नाही.
>कमी दिवसांची यात्रा?
कोरोनाच्या साथीमुळे यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा अगदी थोडक्या दिवसांसाठी असावी, असा विचार सरकार करीत आहे. ही यात्रा २१ जुलैपासून सुरू होऊन आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याबाबत सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.