अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:42 PM2022-06-29T18:42:44+5:302022-06-29T18:43:00+5:30
Amarnath Yatra 2022: भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात विविध विभागांचे 40 हजारांहून अधिक जवान तैनात असतील.
Amarnath Yatra 2022: काल राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिंप्याची दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर देशात दहशतवादी कारवायांबाबत सरकार अलर्ट मोडवर आहे. यातच, यंदाच्या अमरनाथ यात्रेवरही संकट येऊ शकते, असे इनपूट मिळाल्याची माहिती आहे. 3,888 मीटर उंचीवर असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेला 'स्टिकी' बॉम्बचा धोका असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा झाली नव्हती. तसेच, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही ही पहिलीच यात्रा आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या टेलरच्या हत्येमुळे देशात दहशतवादी धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत अमरनाथ यात्रेबाबत पोलीस प्रशासनही हाय अलर्टवर आले आहे. काश्मीरचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, स्टिकी बॉम्ब आणि ड्रोन हल्ले, यंदाचे सर्वात मोठे धोके आहेत. परंतु या दोन्हीपासून बचाव करण्यासाठी एक संपूर्ण योजना देखील तयार आहे.
धोक्यांना तोंड देण्याची तयारी
30 जून ते 11 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. ही यात्रा दोन वर्षांनी होत असल्याने जुना विक्रम मोडत यात्रेकरूंची संख्या 8 लाखांवर पोहोचू शकते. अमरनाथ यात्रेत पहिल्यांदाच केंद्राच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) 40 हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.
त्रिस्तरीय सुरक्षा, पर्वत आणि जंगलामध्ये सैन्य
आयजी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रवास तीन स्तरांच्या सुरक्षेत असेल. CAPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी रोड ओपनिंग पार्टी (ROP) साठी संयुक्त तयारी केली आहे. उंच टेकड्या आणि घनदाट जंगले सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी लष्कराची आहे. सर्व लिंक रोड देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे या प्रवासावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी शार्प शूटर आणि स्नायपरही तैनात करण्यात आले आहेत. NDRF, UTSDRF आणि MRT देखील महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. प्रवासात सामील होणारी वाहने आणि प्रवाशांना RFID टॅग देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.