अमरनाथ यात्रा हल्ला; बसचालक सलीमला 3 लाखांचं बक्षीस जाहीर
By Admin | Published: July 11, 2017 05:08 PM2017-07-11T17:08:51+5:302017-07-11T17:08:51+5:30
सलीम शेख याने दाखविलेल्या धाडसासाठी जम्मू-काश्मीर सरकारने त्याला 3 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11- सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार केला गेला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस सलीम नावाचा चालक चालवत होता. बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. सलीम शेख याने दाखविलेल्या धाडसासाठी जम्मू-काश्मीर सरकारने त्याला 3 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच बसमधील ५० अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या ड्रायव्हरची शौर्यपदकासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितलं आहे. सलीम शेख हे गुजरातमधील वलसाडचे रहिवाशी आहेत.
J&K Govt to give Rs 3 lakhs award to bus driver Saleem Sheikh #AmarnathTerrorAttack
— ANI (@ANI_news) July 11, 2017
दहशतवाद्यांच्या गोळीबारात ही बस सापडल्यानंतरही चालकाने बस चालविणं सुरूच ठेवलं होतं. बसमध्ये असलेल्या यात्रेकरूंचा जीव वाचविण्यासाठी त्याने बस थांबवली नाही. जर सलीमने त्यावेळी बस थांबवली असती तर जिवीतहानी वाढली असती, अशी माहिती समोर येते आहे. गोळीबार होत असताना सलीमने बस चालवत ती सुरक्षादलाच्या कॅम्पपर्यंत पोहचवली. तेथिल काही यात्रेकरूंनीही सलीमने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
"गोळीबार सुरू असताना बस चालवणं सुरू ठेवण्याची हिंमत मला देवानेच दिली. म्हणूनच मी थांबलो नाही. गोळीबार सुरूच होता म्हणूनच मी थांबलो नाही", असं बस चालक सलीमने सांगितलं होतं. तसंच "रात्री 9 वाजता आम्हाला सलीमने फोन करून गोळीबाराची माहिती दिली होती. गोळीबारात सात जणांना सलीम वाचवू शकले नाहीत पण पन्नासपेक्षा जास्त यात्रेकरूंना त्यांनी सुरक्षीत ठिकाणी पोहचवलं, याचा आम्हाला गर्व आहे, अशी प्रतिक्रिया सलीमचे नातेवाईक जावेद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
People from Gujarat who have lost lives will get Rs 10 lakh each from Gujarat Govt, injured to be given Rs 2 lakh: Vijay Rupani,Gujarat CM pic.twitter.com/fUOWmL4Hwd
— ANI (@ANI_news) July 11, 2017
आणखी वाचा
नियमांचं उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.