अमरनाथ यात्रा संपन्न, 2.60 लाख भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 11:57 AM2017-08-08T11:57:01+5:302017-08-08T12:13:52+5:30
काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे.
श्रीनगर, दि. 8 - काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे. तर 2016 वर्षात 2 लाख 20 हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, या वर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान 60 भाविकांचा मृत्यू झाला आहे.
अमरनाथ यात्रा 29 जून रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गाहून सुरू झाली होती. बहुतांश भाविकांनी 45 किलोमीटर लांब असलेल्या पारंपरिक पहलगाम चंदनवाडी मार्गाऐवजी 16 किलोमीटर असलेल्या बालटाल मार्गाहून ही यात्रा पूर्ण केली.
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार अधिका-यांकडून यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण सावधगिरी बाळगण्यात आली. या यात्रेत नोंदणीकृत भाविकांशिवाय अन्य कुणालाही सहभागी होऊ देण्यात आले नाही.
प्रशासनाकडून विशेष काळजी
भाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक पदरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. यात्रेकरू आणि वाहनांच्या शोधासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली होती. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आले होते. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण दिले गेले होते.
अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला
दरम्यान 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता.
कसा झाला हल्ला ?
मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता