भाविकांसाठी खुशखबर; लवकरच तयार होणार अमरनाथचा रस्ता, 8 ते 9 तासांत पूर्ण होणार यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 07:24 PM2023-10-29T19:24:46+5:302023-10-29T19:26:43+5:30
बीआरओने हाती घेतले अशक्य काम, 3 दिवसांची अमरनाथ यात्रा 8 ते 9 तासांत पूर्ण होणार.
Amarnath Road Project: अमरनाथ यांत्रेकरुंसाठी खुशखबर आहे. श्री अमरनाथच्या पवित्र गुंहेपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3888 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेकडे जाणारा रस्ता लवकरच तयार होणार आहे. 5300 कोटी रुपये खर्चुन हा रस्ता बांधला जात आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर दरड कोसळणे, यासारख्या आव्हानांपासून भाविकांची मुक्तता होणार आहे, यासोबतच तीन दिवसीय अमरनाथ यात्रा 8-9 तासात मध्ये पूर्ण होणार आहे.
या कठीण कामात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ)चीही मदत घेतली जात आहे. यासोबतच पर्वत रेंज प्रकल्पांतर्गत बालटाल ते पवित्र गुहा असा नऊ किलोमीटर लांबीचा रोपवे 750 कोटी रुपयांमध्ये बांधण्याचीही योजना आहे. त्याचा डीपीआरही पुढील महिन्यापर्यंत तयार होईल. या मोहिमेत BRO पहलगामसह बालटालच्या दोन्ही किनाऱ्यांवरील पवित्र गुहेचे मार्ग रुंद करण्याचे काम करत आहे. हा प्रकल्प त्वरीत पूर्ण करण्यासाठी बीआरओचे ट्रक आणि लहान पिकअप वाहने पवित्र गुहेपर्यंत पोहोचली आहेत.
शेषनाग आणि पंचतरणी दरम्यान 10.8 किमी लांबीचा बोगदा
चंदनबारी ते पवित्र गुहेपर्यंतच्या मार्गावर शेषनाग ते पंचतरणी दरम्यान 10.8 किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे, जेणेकरून यात्रेकरूंना खराब हवामानात सुरक्षित आणि अखंड प्रवास करता येईल. याशिवाय पंचतर्णी ते पवित्र गुहेपर्यंत 5 किलोमीटर लांबीचा आणि साडेपाच मीटर रुंद पक्का रस्तादेखील तयार करण्यात येत आहे.
बालटाल विभागाच्या कामालाही वेग आला
बालटाल मार्गाच्या या भागावरदेखील काम सुरू आहे, जे गुहेपर्यंत सुमारे 14 किलोमीटर लांब आहे. या कामाची जबाबदारी गेल्या वर्षी बीआरओकडे सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे अनेक भागही पूर्ण झाले आहेत, विशेषत: भूस्खलन प्रवण भागात टेकड्यांवर भिंती बांधल्या जात आहेत. अमरनाथ यात्रा मार्गासाठी चिनूक हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वात आधी अवजड यंत्रसामग्री नेण्यात आली. संपूर्ण मार्गावर डोझर, रॉक ब्रेकर्स आणि ट्रॅक्टर तैनात करण्यात आले आहेत. लवकरच याचे काम पूर्ण होईल, जेणेकरुन भाविकांना वाहनातून गुहेपर्यंत पोहोचतील.